पंढरीचा वास चंद्रभागे स्नान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणिक दर्शन विठोबाचे

हेचि घडो मज जन्म जन्मांतरी

मागणे श्रीहरी नाही दुजे

मुखी नाम सदा संतांचे दर्शन

जनी जनार्दन ऐसा भाव

नामदेव महाराजांच्या अभंगाचे कवन गात ऊन वारा पावसाची यत्किंचही तमा न बाळगता माळकरी, टाळकरी, प्रवचनकार, कीर्तनकार आणि प्रबोधनकार यांचा समावेश असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सातारा जिल्ह्य़ाच्या सेवेत तृप्त होऊन सातारा जिल्ह्य़ाचा भावपूर्ण निरोप घेत सोलापूरकरांचे उत्स्फूर्त स्वागत स्वीकारत सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला. यावेळी सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्य़ातील बरड (ता फलटण) येथील शेवटचा मुक्काम उरकून पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवत सोलापूर जिल्ह्य़ातील पहिल्या मुक्कामाकडे निघाला. राजुरी येथील साधुबुंवाच्या ओढय़ावर जेवण आटोपून हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. सातारा-सोलापूर जिल्ह्य़ाच्या सीमेवर धर्मपुरी बंगला नजीक पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामच्या जयघोषात, टाळमृदंगाच्या गजरात सकाळी अकरा वाजता सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंत्री सुभाष देशमुख, माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस, आमदार रामहरी रुपनवर, घैर्यशील मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जिल्हाधिकारी रणजितकुमार, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे आदींनी स्वागत केले. माउलींना निरोप देण्यासाठी पंरपरेप्रमाणे साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल,पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, अप्पर जिलहाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ माने, प्रांताधिकारी विजय देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार विजय पाटील, फलटणचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, ग्रामीणचे अशोक शेळके आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केल्यावर सोहळा धर्मपुरी येथे दुपारच्या भोजणासाठी थांबला तर नातेपुते येथे पहिल्या मुक्कामासाठी विसावला. स्वागतस्थळी प्रसिध्द महिला भारुडकार चंदाताई तीवरे, औरंगाबादचे प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार खंडूजी गायकवाड (धोबी) यांनी संत गाडगेबाबांच्या वेषात केलेले प्रवचन, कामरगाव (जि. वाशिम) येथील शिक्षकाने पर्यावरणाविषयी केलेली यंत्रमानवाची प्रतिकृती लक्षणीय ठरली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitthal palkhi in solapur