तेवीस हजार भाविक दर्शन घेणार
आषाढी यात्रेच्या पाश्र्वभूमीवर श्री विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. १ जुल ते १३ जुल अखेर २३ हजार ९२१ भाविकांनी ऑनलाईन दर्शनासाठी बुकिंग केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
आषाढी एकादशी सोहळयासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे येतो. पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी झालेले असतात. एस.टी व खासगी वाहनाने लाखो भाविक येतात. यामुळे शहरात १२ ते १५ लाख भाविक दाखल होतात. आलेल्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. भाविकांना लवकर दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीने ऑनलाइन दर्शन बुकिंग योजना सुरू केली आहे. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यात्रा कालावधीत ऑनलाइन दर्शनामुळे पददर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे मंदिर समिती यात्रा कालावधीत १३ ते २० जुल या कालावधीत ऑनलाइन दर्शन बुकिंग बंद केले आहे. आतापर्यंत अनेक भाविकांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची तारीख आणि वेळ याचे बुकिंग केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांनी बुकिंग मोठ्या प्रमाणत केल्याचे तेली यांनी सांगितले.