पंढरपूर : यंदा मराठी महिन्यात पुरुषोत्तम अर्थात अधिक महिना आला होता. या महिन्यात पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी भाविकांनी अधिकचे दान मुक्तहस्ताने दिले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विविध माध्यमातून या महिन्यात तब्बल ७ कोटी १९ लाख ४३ हजार रुपयांचे दान मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. अधिक महिन्यात देवाला सोने चांदी अर्पण केले जाते. या माध्यमातून ३२ लाख रुपयाचे सोने चांदी समितीला प्राप्त झाल्याची माहिती सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
अधिक महिन्यात म्हणजेच १८ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत पंढरीत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. अधिक महिन्यात देवाचे दर्शन महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये श्री विठ्ठलाच्या चरणावर ५४,८४,४२१ रुपये तर रुक्मिणीमातेच्या चरणी १९,१२,९४० भाविकांनी दिले. नित्यपूजेच्या माध्यमातून ५ लाख २ हजार रुपये तर १ कोटी ४६ लाख २४ हजार ४६१ रुपयांची देणगी तसेच ४ लाख ५६ हजार ७२७ रुपये ऑनलाईन देणगी समितीला प्राप्त झाली आहे. तर ऑनलाईन नित्यपूजा झ्र् ८ लाख ९५ हजार, ऑनलाईन तुळशी अर्चन पूजा झ्र् ४६ हजार २०० आदी स्वरूपात समितीला भाविकांनी भरभरून दान दिल्याची माहिती शेळके यांनी दिली आहे.
अधिक मासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा आहे. या माध्यमातून २४ लाख ९८ हजार ८९० रुपये किंमतीचे सोने व ८ लाख १८ हजार ८५९ रुपये किंमतीचे चांदीच्या वस्तू भाविकांकडून प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व प्राप्त देणगीतून भाविकांना अत्याधुनिक व पुरेशा प्रमाणात सोईसुविधा देण्याचा प्रयत्न मंदिर समितीचा राहणार असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले. सन २०१८ साली अधिक महिन्यात मंदिर समितीला २ कोटी ३२ लाख रुपयांचे दान प्राप्त झाले होते. त्या तुलनेने यंदा जवळपास ४ कोटी ८६ लाख ९१ हजार रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे अधिक महिन्यात समितीच्या उत्पन्नात अधिक वाढ झाली.