लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरसंवर्धन आणि जतनाचे काम येत्या जून महिन्यापूर्वी पूर्ण करणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. दरम्यान, शिर्डी, तिरुपतीच्या धर्तीवर येणाऱ्या भाविकांना टोकन दर्शन सुविधा पंढरीत लवकरच सुरु केली जाणार असून, याबाबतचे काम ‘टीसीएस’ कंपनीला देण्यात आले असून, संबंधित कंपनी याचे लवकरच प्रात्यक्षिक सादर करणार असल्याचेही औसेकर यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीला मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश जवंजाळ महाराज, शिवाजी मोरे महाराज, भास्कर गिरी बाबा, माधवी निगडे, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेश कदम, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरवातीला ४ एप्रिल रोजी भरणाऱ्या चैत्री वारीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधेबाबत नियोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय करण्याचे नियोजन करावे अशी सूचना देण्यात आली.

दरम्यान, सध्या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यामध्ये गाभारा, अंतराळ, चौखांबी, सोळखांबी याची कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचा आदेश ठेकेदाराला दिला आहे. दगडी कामास कोटिंग करणे, वॉटरप्रूफिंगची कामे पावसाळ्यापूर्वी करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शिर्डी आणि तिरुपतीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन सुविधा मंदिर समितीतर्फे नियोजित आहे. ही सुविधा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर भाविकांना दर्शनाची नेमकी तारीख, वेळ अगोदरच समजेल. त्यामुळे त्यांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. यासाठीचे काम काम ‘टीसीएस’ कंपनीला देण्यात आले आहे. या संदर्भात कंपनीचे अधिकारी आणि समितीचे विश्वस्त यांच्यामध्ये बैठक झाली असून संबंधित कंपनी लवकरच प्रात्यक्षिक सादर करणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक होणार आहे. सुरक्षा आणि तांत्रिक बाबींचा विचार करून ही सुविधा आषाढी यात्रेला देण्याचा विचार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माहिती दिली.

Story img Loader