विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने लोकसहभागातून उभारलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा हे सामाजिक संस्थांचे एकात्मतेचे चांगले दर्शन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सरकार्यवाह सुरेश सदाशिव उपाख्य, भैयाजी जोशी यांनी केले.
भयाजी जोशी लातूर दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी लोकसहभागातून उभारल्या गेलेल्या स्वामी विवेकानंद पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. रा. स्व. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे विभाग संघचालक डॉ. अशोक कुकडे, डॉ. राजेश पाटील आदी उपस्थित होते. भयाजी जोशी यांनी कन्याकुमारीनंतर लातुरात लोकसहभागातून उभारलेल्या या प्रकल्पात योगदान दिलेल्या सर्वाचे कौतुक केले. कन्याकुमारीतील प्रकल्प देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. शहरातील हा प्रकल्प सामाजिक संस्थांचे एकात्मतेचे चांगले दर्शन आहे. या आगळय़ावेगळय़ा कामातून माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळत राहील. अनेकांना मार्गदर्शक ठरणारे हे काम आहे,  असे ते म्हणाले. संस्थेचे अॅड. संजय पांडे यांनी स्वागत केले.