नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्य़ातील सुमारे ११ हजार मतदारांनी ‘नोटा’ अधिकाराचा वापर केल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर ‘नन ऑफ द अबॉव्ह (नोटा)’ हे मत नोंदवून नकाराधिकाराचा वापर करण्याची सुविधा गेल्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्या निवडणुकीत या सुविधेचा फारसा वापर झाल्याचे दिसून आले नाही. पण गेल्या रविवारी झालेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीमध्ये जिल्ह्य़ातील ११ हजार ६९० मतदारांनी  या नकाराधिकाराचा वापर केला. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या १५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. त्यामध्ये जिल्ह्य़ातील एकूण ७ लाख ९६ हजार ९५९ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी दापोली मतदारसंघात ३ हजार ३४६, गुहागरात १ हजार ६९२, चिपळूणमध्ये २ हजार ०१३, रत्नागिरीत २ हजार ७०४ आणि राजापूर मतदारसंघामध्ये १ हजार ९३५ मतदारांनी हा नकाराधिकार वापरला आहे.

Story img Loader