ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली. आता उद्या (मंगळवारी) जिल्ह्यात ५२४ पकी ४७९ ग्रामपंचायतींसाठी दीड हजार केंद्रांवर मतदान होणार आहे. ६ लाख २९ हजार ८८७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रियेसाठी साडेसहा हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. ४५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. आता उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
जिल्ह्यात मोठय़ा टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली. सोमवारी मतदान केंद्र अधिकारी, पोलीस कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रांवर रवाना झाले. परभणी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच ही मतदानाची वेळ आहे. या साठी २४८ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. ९९२ कर्मचाऱ्यांसह ३०० पोलीस कर्मचारी व १५ क्षेत्रीय अधिकारी या कामासाठी तनात केले आहेत. तसेच १० टक्के कर्मचारी राखीव असून मुस्लीम महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी ८० महिलांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात एकूण १२० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यात सर्वात आघाडीवर पूर्णा तालुका आहे. या तालुक्यातील २४ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. जिंतूर तालुक्यात २१, गंगाखेड १८, परभणी १२, सेलू ६, पालम ६, पाथरीत ९, मानवतमध्ये १५ आणि सोनपेठ तालुक्यात ९ मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन अधिकारी, एक शिपाई आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना दोन टप्यात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या असून आता उर्वरित ४७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. परभणी तालुक्यात एक लाख ११ हजार ४६६ मतदार आहेत. जिंतूरमध्ये ८३ हजार ३४३, सेलूत ६७ हजार ०७६, गंगाखेड ९० हजार ४९४, पालम ४० हजार ७१२, पूर्णा ८० हजार २६०, पाथरी ६१ हजार ९६६, मानवत ४७ हजार ४३०, सोनपेठमध्ये ४७ हजार ९० असे एकूण ६ लाख २९ हजार ८८७ मतदार मतदान करणार आहेत.
मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनासह बाहेरून बंदोबस्त मागविला आहे. सोमवारी सर्वच तालुक्यात ईव्हीएम मशिनसह इतर साहित्य घेऊन मतदान कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. प्रचाराच्या तोफा रविवारीच थंडावल्याने उमेदवार दार बंद प्रचारात मग्न आहेत. आजची रात्र या उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. रात्रीतून अनेक घडामोडी होणार आहेत. अनेक गावांत रविवारपासून उमेदवार रात्र जागून काढत आहेत. निवडणुकीत पशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने विरोधी उमेदवारांवर लक्ष ठेवण्यास कडा पहारा दिला जात आहे. गुरुवारी (दि. ६) या रणधुमाळीचा निकाल लागणार आहे.

Story img Loader