पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढाई प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. प्रचारादरम्यान कीर्तन, लग्नसराई अशा विविध कार्यक्रमांत एकमेकांसमोर आलेल्या आढळराव आणि कोल्हे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, यंदा शिरूरमध्ये केवळ ५४.१६ टक्केच मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ५.३० टक्के मतदान कमी झाले आहे. हा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मतांच्या ध्रुवीकरणावर निकाल अवलंबून

मतदारसंघातील बलाबल यांचा विचार केल्यास चार विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, तर एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि एक आमदार भाजपचा आहे. त्यामुळे वरकरणी आढळरावांचे पारडे जड वाटत असले, तरी कोल्हे यांनी समाजमाध्यमातून आणि थेट अजित पवार यांनाच अंगावर घेत प्रचारात मुसंडी मारली होती. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. राज्याचे सहकार मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घरातच पाय घसरून पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. परिणामी, ते प्रचारापासून दूर राहिले. त्याचा फटका आढळराव यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हे यांच्यावर टोकाची टीका केल्याने त्यांना सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हे यांनी पाच वर्षे मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नसल्याची टीका त्यांच्यावर झाली. तसेच अभिनेता म्हणून पाच वर्षे ‘ब्रेक’ घेणार असल्याची त्यांची भूमिका प्रचारात त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, मतदानाच्या टक्केवारीत हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ सर्वात तळाशी दिसत असले, तरी प्रत्यक्ष मतदान हडपसरमध्ये सर्वाधिक दोन लाख ७७ हजार ६४५ आणि भोसरीत दोन लाख ७२ हजार ५३९ इतके झाले आहे. त्यामुळे हे दोन मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting percentage decrease in shirur lok sabha constituency compared to last election zws