सांगली : जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी ३६५ केंद्रांवर उद्या रविवारी मतदान होत असून यासाठी आवश्यक कर्मचारी आज मतदान केंद्रांवर रवाना झाले. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटाही रवाना करण्यात आला असून उद्याच्या निवडणुकीमध्ये १ हजार ७२८ जणांचे भवितव्य मतदार निश्‍चित करणार आहेत.

जिल्ह्यात जाहीर झालेल्या ९४ पैकी ११ ग्रामपंचायती आणि १३ गावी थेट सरपंच अविरोध निवडण्यात आले असून उर्वरित ८० गावांच्या थेट सरपंच पदासाठी २६८ तर सदस्य पदाच्या ६६४ जागांसाठी १ हजार ५०५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी ३६५ मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून मतदान प्रक्रियेसाठी २ हजार ४३४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आज हे कर्मचारी मतदान यंत्रासह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले. निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये एकूण १ लाख ८७ हजार ७९८ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार ९६ हजार ८६७, स्त्री मतदार ९० हजार ९३० व इतर १ मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर कर्मचारी नेण्यासाठी आणि आणण्यासाठी ५६ बस व ५५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा – “एल्विश यादव मुंबईत लपलाय, त्याला…”, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; म्हणाले…

हेही वाचा – स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे साखर चोरी उघड – राजू शेट्टी

११ संवेदनशील गावे

मिरज तालुक्यातील जानराववाडी, अपर सांगलीमधील हरिपूर व नांद्रे, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, कोकळे, ढालगाव, दुधेभावी, ढोलेवाडी व देशिंग, पलूस तालुक्यातील कुंडल व आमणापूर ही संवेदनशील गावे आहेत. याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असल्याचे सांगण्यात आले. रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.