रमेश पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बनावट उत्पादनाला जोम; भौगोलिक मानांकन मिळवून देण्यात वाडय़ातील नेतृत्व उदासीन

आंतरराष्ट्रीय बाजारात नावारूपाला आलेल्या ‘वाडा कोलम’ला भौगोलिक ओळख (जीआय मानांकन) मिळेल, या आशेवर वाडा तालुक्यातील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी कोलमच्या नव्या वाणाचे उत्पादन  घेण्याची तयारी केली आहे. मात्र यासाठी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर उदासीनता असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पालसई, घोडमाळ, खानिवली, भावेघर, सांगे, बिलोशी येथील ५०हून अधिक गावांतील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी वाडा कोलमचे उत्पादन घेण्याची तयारी केली आहे व काही शेतकऱ्यांनी त्याची पेरणीही केली आहे. मात्र वाडा कोलमला भौगोलिक मानांकन नसल्याने अन्य बनावट तांदूळ वाडा कोलमच्या नावे पुन्हा विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वाडा कोलमला भौगोलिक जीआय मानांकन मिळून स्वामित्त्व मिळावे, अशी मागणी वाडय़ातील वाडा कोलम उत्पादक शेतऱ्यांनी केली आहे.

मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळाल्यास राज्यात आणि राज्याबाहेर बनावट वाडा कोलमची विक्री थांबेल, अशी अपेक्षा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वाडा तालुक्याला सुपीक शेतजमिनीची देणगी आहे. या जमिनीत सुगंधी आणि चवदार वाडा कोलम पिकतो.   त्यामुळे वाडा कोलमला भौगोलिक ओळख मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

‘वाडा कोलम’ला ‘जीआय’ मानांकन आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी येथील शेतकरी दोन वर्षांपासून शासन, प्रशासन दरबारी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात अद्याप यश मिळालेले नाही. वाडा येथील रहिवासी आणि माजी आदिवासी विकास मंत्री तथा माजी पालकमंत्री विष्णू सवरा, येथील आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे हे लोकप्रतिनिधी वाडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. या लोकप्रतिनिधींनी वाडा कोलमसाठी भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

वाडा येथे उपविभागीय कृषी अधिकारी यांचे कार्यालय आहे. या अधिकाऱ्यांकडे येथील शेतकऱ्यांनी याबाबत अनेकदा खेटे मारले आहेत. यावर अद्याप दोनच बैठका झाल्या आहेत. याशिवाय अन्य कोणतीही हालचाल झालेली नाही. वाडा कोलमला मानांकनासाठी मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर येथील प्रशासनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

यंदा वाडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ‘वाडा’ कोलमचे उत्पादन घेण्याची पूर्वतयारी केली आहे. त्यासाठी येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी वाडा कोलमचे बियाणे नव्याने विकसित केले आहे.

कमी दराने विक्री

वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वाडा कोलमचे उत्पादन घेण्यासाठी प्रत्यक्षात पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलला खर्च येत असताना याच दराने वा त्यापेक्षा कमी दराने बनावट  वाडा कोलम विकला जात आहे. त्यामुळे वाडय़ातील शेतकऱ्यांनी मूळ वाडा कोलम विक्री परवडत नसल्याने त्याचे उत्पादन घेणे कमी केले आहे.

‘वाडा कोलम’ ला भौगोलिक मानांकन मिळाल्यास सध्या बनावट वाडा कोलमच्या नावाने ग्राहाकांची होणारी फसवणूक थांबेल.

– हरिभाऊ  पाटील, वाडा कोलम उत्पादक शेतकरी

वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रयत्नांना यश येईल.

– प्रवीण गवांदे, उपविभागीय कृषी अधिकारी, वाडा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wada kolam rice palghar fake product abn