रमेश पाटील, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाडा: लवकरच येत असलेल्या बकरी ईदच्या अनुषंगाने विविध ठिकाणावरून अवैधरित्या जनावरांची वाहतूक सुरु आहे. शुक्रवारी (२३ जून) वाडा तालुक्यातील वडवली येथील माध्यमिक शाळेजवळील एका चाळीत अवैधरित्या दाटीवाटीने कोंडून ठेवलेल्या ३२ जनावरांची सुटका वाडा पोलीसांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने केली.

तालुक्यातील वडवली येथील एका माध्यमिक शाळेजवळ अवैधरित्या जनावरे कोंडून ठेवल्याची माहिती एका खबऱ्याकडून वाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांना मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवली येथे छापा टाकला असता एका लहानशा जागेत ही ३२ जनावरे कोंडून ठेवलेली आढळून आली.

आणखी वाचा-पहिल्याच पावसात सोलापूरकरांची अशी झाली त्रेधातिरपीट; नालेसफाईचा फोलपणाही उघड

दुसऱ्याच दिवशी वडवली उसरकॅम्प येथील एका घरात पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात १४ जनावरे कोंडून ठेवलेली आढळून आली. या दोन्ही घटनेत ही सर्व जनावरे (गाई, बैल, वासरे) अत्यंत क्रुरपणे दोराने घट्ट बांधून अत्यंत कमी जागेत कोंबण्यात आली होती. या जनावरांसाठी कुठल्याही चाऱ्याची व्यवस्था तर करण्यात आली नव्हतीच पण त्यांना दिवसभर पाणीसुद्धा पाजण्यात आले नव्हते.

मुक्या जनावरांना अत्यंत क्रुर वागणुक देणे, त्यांची अवैधरित्या वाहतूक करणे या कलमांखाली एकूण सहा व्यक्तींवर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये, जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाड्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wada police rescued 46 animals brought for sale illegally mrj