रमेश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल

गेल्या पावसाळय़ात कमी पाऊस झाल्याने, कडाक्याच्या उन्हामुळे आणि पाण्याचे नियोजन करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने वाडा तालुक्यातील नदी, ओढे, विहिरी यांमधील पाणी आटू लागले असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली असून शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसानीला सामोर जावे लागत आहे.

वाडा तालुक्यातील घोडमाळ, सांगे, नाणे, आवंढा, शिलोत्तर येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो, कारली, गवार, भेंडी यांची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली आहे. एक महिन्याचे उत्पादन घेतल्यानंतर अधिक उष्णतेमुळे घोडमाळ, सांगे, नाणे, आवंढा या परिसरातील वैतरणा नदीचे पाणी असलेले सर्व डोह आटून गेल्याने भाजीपाला पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. येथील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभाग आणि राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाकडे मोडकसागर धरणाचे पाणी मिळण्यासाठी वारंवा सांगे, नाणे येथील काही शेतकऱ्यांनी नदीमध्ये जेसीबीच्या साहाय्याने खोल खड्डे खोदून पाण्याचा स्रोत मिळवून भाजीपाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, तर काही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्धतेचा कुठलाच पर्याय शिल्लक न राहिल्याने भाजीपाल्याचे उभे पीक सोडून दिले आहे.

तालुक्यातील विविध गावांतील चारशेहून अधिक शेतकऱ्यांचे पाचशे एकर जमिनीवर          लागवड केलेल्या भाजीपाला पिकाला पाणी नसल्याने फटका बसला आहे. तालुक्यातील वैतरणा, पिंजाळ, गारगाई या नद्या आणि लहान-मोठे ओढे आटले आहेत. पाटबंधारे विभागाने लहान-मोठय़ा बंधाऱ्यांचे दरवाजे वेळीच बंद केले असते तर या नद्यांतील पाणी आटले नसते, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

टोमॅटोला फटका

घोडमाळ येथील शेतकऱ्यांनी २५ एकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली आहे, या वर्षी भावसुद्धा चांगला असल्याने चांगले पैसे मिळत होते. मात्र जलस्रोतातील पाणी संपल्याने अजून १५ दिवस मिळणारे उत्पन्न करपून गेले, असे घोडमाळ येथील शेतकरी पांडुरंग सांबरे यांनी सांगितले. दरवर्षी या नदीतील पाण्याचा स्रोत मेअखेपर्यंत असतो. मात्र या वर्षी तो लवकर आटला आहे, असे आवंढा येथील शेतकरी भगवान राव यांनी सांगितले.

गारगाई आटली

गारगाई नदीत यंदा बिलकूल पाणी नसल्याचे चित्र आहे. या नदीतील पाण्याच्या भरोशावर मोठय़ा प्रमाणात भेंडीची लागवड करणाऱ्या शिलोत्तर गावातील ज्ञानेश्वर पाटील या शेतकऱ्याला मोठे नुकसान झाले. सेवा सहकारी संस्थेकडून कर्ज घेऊन भाजीपाल्याची लागवड केली. अवघ्या १५ दिवसांत भेंडीचे उत्पादन घेतले आणि पाण्याचा स्रोत आटून गेला. भाजीपाल्यासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत सापडलोय, असे शिलोत्तर येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.

यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले. भावसुद्धा चांगला मिळत होता. मात्र आता पाण्याअभावी झळ सोसावी लागत आहे.

– भाई कराळे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, घोडमाळ

पाण्याअभावी नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी.

– शाम माधव पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी, शिलोत्तर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे नेहमीच शासनाने दुर्लक्ष केलेले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा.

– अतुल सावंत, शेतकरी, नाणे