सातारा- छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवशस्त्रशौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार (दि १९) जुलै रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात होणार आहे.
शनिवार (दि २०) जुलैपासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सर्व दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एकावेळी दोनशे लोकांना पाहता येतील येईल. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत राहणार आहे. तर दुपारी १ वाजेच्या पुढील उर्वरित तीन स्लॉट हे नागरिकांना नाममात्र शुल्क आकारून पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल झाली. ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी, तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत, तसेच पोलिस व बाहेरच्या एजन्सीकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही वाघनखे सात महिने सातारकरांना पाहता येणार आहेत.
ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. ही वाघनखे विशेष विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर सातारा पोलिस व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून बुधवारी (दि १७) साताऱ्यात आणण्यात आली. या समारंभास खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियम लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील वाघनखांसोबत साताऱ्यात असतील. याबरोबर वाघनाखांसोबत ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअर टेकर आला असून, तो वाघनखांची सर्व ती काळजी घेणार आहे.
हेही वाचा – रत्नागिरी : लोटे येथील श्री पुष्कर केमिकल कंपनीत स्फोट; कामगार किरकोळ जखमी
सुरक्षिततेच्या कारणास्तव या वाघनखांची मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात वाघनखांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम व दुपारी संग्रहालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. यावेळी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष टपाल तिकिटांचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी साताऱ्यात जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
अशी आहेत वाघनखे
– घटक : पोलाद, चामडे व रेशीम
– मोजमाप : लांबी ८.६ सेमी, खोली ९.५ सेमी, पट्टीची लांबी ७.५ सेमी, अंगठ्याचा व्यास २.५ सेमी (मोठी), २.३ सेमी (लहान)
– नख्यातील अंतर (मोठी अंगठी ते लहान अंगठी) १.८ सेमी, १.८ सेमी, १.५ सेमी
– एकूण वजन ४९ ग्रॅम
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतापगडावरील अद्वितीय शौर्य, पराक्रमाची साक्ष देणारी शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं सर्वप्रथम राजधानी साताऱ्यात आणण्यात आली आहेत आणि ती आपल्याला प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. ऐतिहासिक आणि एकमेवाद्वितीय वाघनखं छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आली असून त्याचे अनावरण आज (शुक्रवारी) होणार आहे. त्यामुळे या वाघनखांच्या स्वागत व अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव वाघनखांची मिरवणूक काढता येणार नाही. शासकीय विश्रामगृहापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांची शासकीय विश्रामगृहापासून मिरवणूक काढण्यात येणार असून पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक संग्रहालयात येईल. तेथे शिवशस्त्रशौर्यगाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर जिल्हा परिषद सभागृहात याविषयी विशेष कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भोसले यांनी केले आहे.