महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघनखांचा मुद्दा चर्चेला आला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखांच्या सत्यतेवर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी त्यांनी ही वाघनखं महाराष्ट्रात कधी, कुठे आणि किती काळ दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत? याविषयीही घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघनखं किती काळ महाराष्ट्रात राहणार?

सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात लंडनच्या म्युझियममधील वाघनखं किती काळ महाराष्ट्रात राहणार? याबाबत माहिती दिली आहे. “ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. १८७५ व १८९६ साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला”, असं मुनगंटीवार म्हणाले.

Video: ब्रिटनच्या संग्रहालयातली वाघनखं छत्रपतींची का मानायची? सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलं निवेदन!

मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेपासून वाघनखं पाहता येणार!

दरम्यान, यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखांबाबत मोठी घोषणा केली. “येत्या १९ जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या शासकीय म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यामुळे वाघनखं नेमकी कधी पाहायला मिळणार, याबाबतच्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिलं आहे.

वाघनखं छत्रपतींचीच का मानायची?

लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता. यावरून चर्चा सुरू झालेली असताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. “अनेक शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवावं. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. १० नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवलं. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनघं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचं उत्तर आलं. १८२५ रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wagh nakh london shivaji maharaj in maharashtra on 19th july at satara museum pmw
Show comments