वाई: यावर्षी कमी पावसामुळे साताऱ्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यात वाई व खंडाळा तालुक्यांचा समावेश आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्रांना विनंती करण्यात आली आहे. आमदार मकरंद पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
साताऱ्यातील दोन्ही दुष्काळी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत निधी मिळणार आहे. दुष्काळात होरफळणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. २१ दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड, पिकातील कमी झालेली आद्रता, शेतीमालाच्या उत्पादनात पन्नास टक्के पेक्षा अधिक घट आणि भूगर्भातील खालवलेली पाणी पातळी, या निष्कर्षांच्या या विकासाच्या आधारे वाई व खंडाळा तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तशी शिफारस कृषी विभागाकडून सरकारला करण्यात आली होती. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यातील दुष्काळी तालुके जाहीर केले. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई तसेच खंडाळा तालुक्याचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
दुष्काळ जाहीर होण्यासाठी शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. याचा विचार करूनच दुष्काळ जाहीर करण्यात येतो. या निष्कर्षामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. ट्रिगर एक मध्ये पावसाशी संबंधित काही निकष आहेत. पावसाचे विचलन तीन ते चार आठवड्याचा खंड आदी बाबी पूर्ण केल्यास त्या तालुक्याचा ट्रिंगर दोन मध्ये समावेश होतो. ट्रिगर दोन मधील निष्कर्ष पूर्ण केल्यानंतर सर्व बाबी तपासून संबंधित तालुक्यात दुष्काळ पडला आहे. इतक्या निष्कर्षापत अहवाल शासनास सादर केला जातो .त्यानंतर शासन संबंधित तालुक्यात दुष्काळ पडल्याचे जाहीर करते. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीपेक्षा १३.४ टक्के घट झाली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरू आहेत. आत्तापर्यंत बारा टक्के पर्यंत पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली. वाई व खंडाळा तालुका दुष्काळी जाहीर झाल्यामुळे आमदार मकरंद पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.