वाई : जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज मंगळवारी वाई बंद पाळण्यात आला.सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद होते. जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज मंगळवारी वाई शहर बंद ची हाक देण्यात आली होती. दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता शहर बंद ठेवण्यात आले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा कॉलेज बंद होते एसटी बस सुरळीत सुरु होत्या. मात्र बस स्थानकावर तुरळक गर्दी होती. सर्व व्यवसाय बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदला पाठींबा दिला होता.दुपारी बारा नंतर भाजी मंडई सुरु झाली.मात्र विक्रेत्यांना ग्राहकांची वाट पहात रहावे लागले. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता.
हेही वाचा… “…तर पंकजा मुंडेंबरोबर युती करू”, बच्चू कडू यांचं मोठं विधान
सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सकाळी वाईहुन साताऱ्याकडे शेकडो कार्यकर्त्यांसह पायी निघालेला मोर्चा पुणे बंगळूर महामार्गावर पाचवड येथे प्रशासनाने अडविला. तेथे शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार,सुधीर वाळुंज,बिपीन चव्हाण आदी अनेक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.