विश्वास पवार
या गावचे सरपंचपद स्वीकारले की मृत्यू होतो ही तिथे खोलवर रुजलेली अंधश्रद्धा. यापूर्वी एकदा नाहीतर तब्बल चार वेळा असे घडल्याने ती गावातल्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली. यामुळे मागील अनेक वर्षांपासून गावचे सरपंचपद रिक्त आहे. मात्र एका महिला सदस्याने या अंधश्रद्धेला छेद देत सरपंचपद स्वीकारण्याचे धाडस दाखवले.
महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावची ही कहाणी. तर या अंधश्रद्धेला मूठमाती देणाऱ्या महिला सदस्याचे नाव आहे शीतल विश्वास राजपुरे! पाचगणीजवळील राजपुरी या गावात मागील पाच कार्यकारिणीच्या कालखंडात तब्बल वीस वर्षे हे पद रिकामे आहे. या काळात सरपंचपदाची माळ गळय़ात पडलेल्या चारही सरपंचांचा पदावर असताना मृत्यू झाला. या घटना सलग झाल्याने या पदावर गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो अशी भीतीच या गावात खोलवर रुजलेली आहे. गावचे उपसरपंचच या काळात गावचा कारभार सांभाळतात.
नुकतीच राजपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या वेळीही हे सरपंचपद स्वीकारण्याबाबत कुणी तयार नसल्याने या अंधश्रद्धेबाबत गावातील तरुण एकत्र आले. यासाठी त्यांनी प्रथम गावात बैठका घेत ग्रामस्थांच्या मनातील भीती घालवली. यंदा सरपंचपद महिला वर्गासाठी राखीव होते. त्यामुळे लढाई अधिक अवघड होती. मात्र या लढय़ात शीतल राजपुरे या महिला सदस्या धाडसाने पुढे आल्या आणि त्यांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली.