सातारा – लोकसभा निवडणुकीत थोड्याफार दुर्लक्षामुळे झालेला दगाफटका लक्षात घेऊन यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी करावी. मतदारसंघनिहाय सर्व्हे केल्यानंतरच मेरिटनुसार उमेदवारीबाबत विचार केला जाईल. वाई व कराड उत्तर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा हक्काचा मतदारसंघ असून, तेथून आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली.
या वेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमित कदम, प्रमोद शिंदे, प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, संजीव देसाई आदी उपस्थित होते.
हेही वाचा – अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना केल्या. पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या चुकांची दुरुस्ती यावेळेस आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत करायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात पक्षाची बांधणी करा, महायुतीत जागा वाटपाबाबत सर्वांशी चर्चा होऊन निर्णय होणार आहे; पण आपली ताकद ज्या ठिकाणी जास्त आहे त्या जागा आपण हक्काने मागून घेऊ. साताऱ्यातील वाई कराड उत्तर हा मतदारसंघ आपल्या हक्काचा मतदारसंघ असून, तेथे आपली ताकद चांगली आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. या मतदारसंघात विशेष लक्ष घाला. मतदारसंघनिहाय सर्वे केल्यानंतरच मेरीटनुसान उमेदवारीबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, जेणेकरून सामान्य जनतेला या योजनांचा लाभ मिळेल, असेही ते म्हणाले. बैठकीनंतर भाजपचे कराड उत्तरचे नेते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची राष्ट्रवादी भवनात येऊन भेट घेतली. या वेळी त्यांची कराड उत्तर मतदारसंघाविषयी चर्चा झाली. याबाबत कदम यांना विचारले असता आमची महायुती असून, आम्ही कामानिमित्त भेटू शकतो, यात राजकारण काहीही नाही, असे स्पष्ट केले.
मकरंद पाटलांविरोधात तगडा उमेदवार शरद पवार देणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना वाई विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत वाईतील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून विधानसभेसाठी इच्छुकांत एकमत करण्याची सूचना पवार यांनी केली.
हेही वाचा – दिवसाउजेडी दोन सदनिकांतील सात लाखांचा ऐवज लंपास
पुण्यात शरद पवारांसोबतच्या बैठकीत रणनीती ठरली आहे. वाई मतदारसंघातून डॉ. नितीन सावंत, अनिल जगताप, रमेश धायगुडे, बंडा ढमाळ, शशिकांत पिसाळ यांची पत्नी अरुणादेवी पिसाळ आदींची नावे इच्छुकांत आहेत. महिला उमेदवार म्हणून अरुणादेवी यांचेही नाव पुढे येऊ शकते. या बैठकीत वाईतील आम्ही सर्व जण एकत्रित बसून एकमत घडवून आणू, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी पवार यांना दिला, तसेच सर्वांची एकजूट घडवून आमदार निवडून आणण्यास आग्रही भूमिका घेणार असल्याचा शब्द सर्वांनी शरद पवार यांना दिल्याचे दिलीप बाबर यांनी सांगितले.