दापोली : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त हुकल्याने साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे. दुसऱ्या बोगद्यात १० पंखे बसवण्यात येणार आहेत. यातील ४ पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंखे बसवण्याच्या कामासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
ही कामे झाल्यानंतर चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच दुसऱ्या बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सांगण्यात आले. कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक खुली झाल्यानंतर वाहनचालकांचा प्रवास सुस्साट अन् आरामदायी झाला होता. सर्वच वाहनचालकांनी बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती दिली.
पहिल्या बोगद्यापाठोपाठ दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला झालेला असतानाच अडथळ्यांचे ‘ग्रहण’ सुरु झाले. दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा घेण्यासाठी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची सबब राष्ट्रीय महामार्ग खात्याने पुढे केली. सद्यस्थितीत एकाच बोगद्यातील दोन्ही बाजुकडील वाहतूक सुरू आहे.