तालुक्यातील वाकी खापरी धरणासाठी संपादित केलेल्या गावाचे आधी पुनर्वसन करावे तसेच पुनर्वसित गावांत मूलभूत सुविधा पुरविल्याशिवाय या धरणाच्या क्षेत्रात अपेक्षित जलसाठा करू नये, अशी सूचना जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केली. वाकी खापरी धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडल्यानंतर या विषयावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. त्या वेळी तटकरे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर उपरोक्त निर्देश दिले. इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. धरणाचे घळभरणीचे काम बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करून बंद पाडले. या विषयावर मुंबईत तटकरे यांच्या उपस्थितीत धरणग्रस्त, विस्थापित, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आ. निर्मला गावित, धरणग्रस्त कृती समितीचे रतनकुमार इचम आदींनी धरणग्रस्तांच्या मागण्या मांडल्या. प्रकल्पग्रस्तांची व्यथा जाणून घेत प्रस्तावित वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या सर्व गावांचे आधी पुनर्वसन करावे, या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या १८ मूलभूत सुविधा पुरवाव्यात, तसेच दोन महिन्यांत मोबदला अदा करावा, सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्वेक्षण करावे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास प्राधान्य द्यावे आदी सूचना तटकरे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या. पुनर्वसनाच्या कामाची पाहणी करून अपूर्ण असणारी कामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

Story img Loader