सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही पर्वणीच्या दिवशी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची पायपीट कमी व्हावी, यादृष्टिने पोलीस प्रशासनाने मार्गामध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून येणारी वाहने शहराबाहेर थांबविल्यानंतर त्याठिकाणाहून एसटी बसने जेथे भाविकांना सोडले जाणार आहे, त्या ठिकाणाचे गोदापात्रापासूनचे अंतर काही किलोमीटरने कमी करण्यात आले आहे.
२९ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर या दिवशी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे तर १९ सप्टेंबरला नाशिक तर २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान होणार आहे. मागील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा एकाच घाटावर गर्दी होऊ न देता गर्दीचे विभाजन करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नाशिकमध्ये नवीन सात तर त्र्यंबकेश्वर येथे तीन घाटांची उभारणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या महामार्गावरून येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी वेगवेगळ्या घाटांवर नेण्यात येणार आहे. पर्वणीच्या दिवशी शहरात खासगी वाहनांच्या प्रवेशास प्रतिबंध घालण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर पालिका हद्दीलगत खासगी वाहनांसाठी खास वाहनतळांची उभारणी करण्यात आली आहे. या तळांलगत प्रत्येक ठिकाणी तात्पुरत्या बस स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. येथून भाविकांना बसने शहरातील अंतर्गत वाहतळावर दाखल होता येईल. बसमार्गे भाविकांना शहरातील अंतर्गत वाहनतळापर्यंत उतरविले जाईल. हे अंतर पूर्वी मध्यवर्ती भागातील गोदावरी नदीपासून किमान तीन ते कमाल सात किलोमीटर इतके होते. परंतु, भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने काही बदल केले आहेत.
नवीन बदलानुसार औरंगाबादकडून येणाऱ्या भाविकांना माडसांगवीऐवजी महापालिकेच्या कमानीलगत बस स्थानकात सोडले जाईल. पेठरोडमार्गे येणाऱ्या भाविकांना शरदचंद्र पवार बाजारऐवजी डोंगरे वसतीगृहात, पुणेमार्गे येणाऱ्यांना सिन्नरफाटा पोलीस चौकीऐवजी आता रोकडोबा दग्र्याजवळ, त्र्यंबकेश्वरमार्गे येणाऱ्यांना सातपूरऐवजी मुंबई नाका बस स्थानकात सोडले जाणार आहे. धुळे आणि मुंबईकडून येणाऱ्या भाविकांच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी स्पष्ट केले.
..तर शाही स्नानावर बहिष्कार
यंबकेश्वर येथील कुशावर्तात झिरपणाऱ्या दरुगधीयुक्त पाण्यास वेळीच अटकाव न केल्यास शाही स्नानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा महंत कृष्णदेवानंदगिरी महाराज यांनी दिल्याने प्रशासनासमोर नवीनच संकट उभे ठाकले आहे. नील पर्वतावर महंत कृष्णदेवानंदगिरी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. कुशावर्तात शाही स्नान केले जाते. परिसरातील अशुध्द व दरुगधीयुक्त पाणी कुशावर्तात झिरपत असल्याची तक्रार महंतांनी यावेळी मांडली. या दरुगधीयुक्त पाण्याचा कुशावर्तातील पाण्यावर प्रतिकूल परिणाम होत असून झिरपणाऱ्या दरुगधीयुक्त पाण्यावर प्रशासनाकडून त्वरीत उपाय करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू करण्यात आलेल्या पास पध्दतीवरही महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.