रायगड जिल्ह्यातील मोहाची वाडी येथे घराची भिंत कोसळल्याने एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. सदर घटनेत किसन दिघे, सुनंदा दिघे, स्वप्नेश दिघे, जाईबाई कदम आणि अर्चना दिघे यांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात आज सरासरी १३५ मीमी पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
रविवार दुपारपासून जिल्हात पावसाचा वेग वाढला आहे. महाड शहराला सावित्री गांधारी व काळ नदीचा वेढा पडल्याने शहरातील सखल भागात पाणी शिरले होते. रायगडकडे जाणारा दस्तूरी नाका ते नाते खिंड रस्ता चार फूट पाण्याखाली होता. नाते गावाचा गांधारी नदीवरील पूल देखील पाण्याखाली होता. बिरवाडी गावातही सावित्रीचे पाणी शिरले होते. पेण, रोहा येथील सखल भागातही पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
महाड तालुक्यात रात्री वादळ झाल्याने मुंबई गोवा महामार्गावर तीन ठिकाणी झाडे पडली होती. तर वहूर व दासगाव दरम्यान महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक चार तास ठप्प झाली होती.
आज सकाळपासून महाड शहरातील सखल भागातील पाणी ओसरले असून नाते पूल वाहतूकीस खुला झाला आहे. परंतू नेरळ येथील दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण मृत झाल्याने जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.
दरड कोसळून माय-लेकी ठार
संततधार पावसामुळे रत्नागिरी शहरालगत शिरगाव-बाणेवाडी येथील रमाकांत बाणे यांच्या घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात सुलभा बाणे व कविता बाणे या माय-लेकी मृत्युमुखी पडल्या. याच कुटुंबातील सूरज हा मुलगा जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.