Walmik Karad Arrested at Pune CID Office: बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सीयाडीकडे सोपविल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी हत्या प्रकरणामधील आरोपींची बँक खाती आणि संपत्ती गोठविल्यानंतर आता खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाली की, आम्हाला न्याय मिळायला हवा, एवढीच आमची मागणी आहे. आरोपी जर स्वतःहून पोलिसांना शरण येत असेल तर पोलीस यंत्रणा काय करते? हा प्रश्न निर्माण होतो.
वैभवी देशमुख पुढे म्हणाली, जर पोलीस आरोपींना पकडू शकत नसतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडू करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की, सीडीआरनुसार जे जे आरोपी आढळतील त्यांना सर्वांना अटक करून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या. वाल्मिक कराड यांच्या शरणागतीबाबत प्रश्न विचारला असता वैभवी देशमुख म्हणाली की, वाल्मिक कराड यांनीही चौकशीअंती दोषी आढळल्यास शिक्षा देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. आता पोलिसांनी तपास लवकर पूर्ण करायला हवा.
वाल्मिक कराड यांच्या शरण येण्यावर संतोष देशमुख यांची बहीण म्हणाली की, ते स्वतःहून शरण आले. पण इतर आरोपींना कधी पडकले जाणार? हत्येमधील तीन आरोपी कुठे गेले? २२ दिवस झाले माझ्या भावाची हत्या होऊन. पण अद्यापही आरोपी फरार आहेत. आम्हाला राजकारणातले काही कळत नाही. माझ्या भावानेही कधी राजकारण केले नाही. तो समाजसेवा करत होता. माझ्या भावासारख्या देवमाणसाची इतकी निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक केली पाहीजे.
तर मी शिक्षा भोगायला तयार – कराड
दरम्यान वाल्मिक कराडने शरण येण्यापूर्वी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ज्यात त्यांनी म्हटले, “मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण होत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”