Walmik Karad health Update Video : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या हत्येमध्ये सभभागी असलेल्या आरोपींना कठोरता कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. यादरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड हे नाव देखील चांगलेच चर्चेत आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. यानंतर बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक डॉ.एस.बी. राऊत यांनी कराडच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
वाल्मिक कराडला पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृहाकडून कळवण्यात आले होते, त्यानुसार कारागृहात जाऊन डॉक्टरने तपासणी केली होती. तसेच पुढील तपासणी करण्यासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार कारागृह प्रशासनाने कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टर काय म्हणाले?
बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक डॉ.एस.बी. राऊत म्हणाले की, “वाल्मिक कराड नावाचे जे आरोपी आहेत, त्यांना पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृह प्रशासनाकडून लेखी कळवण्यात आले होते. पोटाचा त्रास असल्याने आपले शल्यचिकित्सकांनी संध्याकाळी जाऊन तपासणी केली. तपासणीअंती गरज वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता”.
“त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्याना रात्री साडे बारा वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डीएमओने डॉक्टरांना बोलवून पूर्ण तपासण्या करून पुढील तपासण्या सांगितल्या”, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान सध्या पोटदुखीचा त्रास होत असल्याने वाल्मिक कराडला रात्री साडेबारा वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या याच ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्याच्या काही तपासणी करण्यात येणार आहेत. सोनोग्राफी, रक्त तपासणी, युरीन टेस्ट केली जाणार आहे. तसेच या तपासण्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.