Walmik Karad MACOCA And Jitendra Awhad : बीड जिल्ह्यातील केज न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर कराडची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणाबाबत वाल्मिक कराड याला आज (१४ जानेवारी) बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी शहरात तणावाचे वातावरण असून, वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी बोलताना आमदार आव्हाड म्हणाले, “परळीमध्ये सर्व पोलीस अधिकारी वाल्मिक कराडनेच आणले असून, त्यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन जरी झाले तरी कोणी काही करू शकणार नाही.”
तो अजूनही तिथेच बसला आहे…
आज केज न्यायालयात वाल्मिक कारडवर आरोप असलेल्या खंडणी प्रकरणी सुनावणी होती. त्यापूर्वी सकाळपासून परळीमध्ये कराडच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती. इतकेच नव्हे तर वाल्मिक कराडची आईसह कुटुंहबीयांनी परळीत ठिय्या आंदोलन केले होते. तसेच त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याचा बाहेर आंदोलन सुरू केले आहे.
यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “पोलीस ठाण्यातील अर्धे अधिकारी वाल्मिक कराडनेच आणलेलेच आहे. खेडकर नावाचा जो अधिकारी आहे, तो वाल्मिक कराडनेच आणलेला आहे. तो अजूनही तिथेच बसला आहे. त्याच्यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन झाले तर कोण काय करणार आहे.”
सीआयडीची मागणी फेटाळली
दरम्यान आज केज न्यायालयात सरकारी वकिलांनी वाल्मिकची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडच प्रमुख आरोपी असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. त्यामुळे या हत्या प्रकरणाचे पुरावे गोळा करण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूला चालू आहे.
वाल्मिक कराडवर ‘मकोका’
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख आरोपी असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांमधील नेते करत आहेत. याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी होत होती.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिकवर मकोका लावण्यात आला नव्हता. त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती. अखेर वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आला आहे.