Walmik Karad Mother Reaction : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिककराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज याप्रकरणी बीड जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर परळीत आंदोलन करण्यात आले.याप्रकरणी वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर काल (१४ जानेवारी) ठिय्या आंदोलन केले.
“माझ्या लेकावर झालेला अन्याय थांबवा आणि त्याची सुटका करा. त्याच्यावर लावलेले सर्व गुन्हे खोटे आहेत. जाणूनबुजून राजकारण केलं जातंय”, असं वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड म्हणाल्या.
माझ्या मुलाने एवढा काय गुन्हा केलाय?
पारूबाई कराड म्हणाल्या, “काय बोलून उपयोग आहे? आम्हाला न्यायच द्यायचा नाहीय. आम्हालाच फाशीची शिक्षा द्या नाहीतर रॉकेल ओता. गेल्या महिनाभर आम्ही सहन करतोय. कितीवेळ सहन करणार? माझ्या लेकावरील खुनाचा गुन्हा मागे घेतला जात नाहीय. काय एवढा गुन्हा केलाय माझ्या लेकाने? असा सवाल त्यांनी केला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
तुमची सरकारकडे काय विनंती आहे, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “आता मी मेले तर पाणी पाजायला तरी माझ्या लेकाला आणा. मला माझ्या जीवाची पर्वा नाही राहिली.”
अखेर वाल्मिक कराडवर ‘मकोका’
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख आरोपी असल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील कराडवर आरोप केले आहेत. त्यामुळे कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी विरोधक करत होते. या हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिकवर मकोका लावण्यात आला नव्हता. त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती. नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आला आहे.