Anjali Damania Questions To Walmik Karad Mother : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्याविरुद्ध महाराष्ट्र सीआयडीने मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि विविध राजकीय पक्षांकडून सतत दबाव येत असल्याने महाराष्ट्र सरकारने सीआयडीला वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर परळीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, वाल्मिक कराडच्या आईसह त्याच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कराडच्या आईने, माझ्या लेकावरचे गुन्हे मागे घतले जात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नसल्याचे म्हटले आहे.
यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट करत वाल्मिक कराडच्या आईला सहा प्रश्न विचारले आहेत. तसेच वास्तव चित्रपट पाहण्याचा सल्ला देत, वाया गेलेल्या मुलाबरोबर आईने काय करायला हवे ते त्यामध्ये पाहावे असा सल्ला दिला आहे.
वाल्मिक कराडच्या आईला दमानियांचे प्रश्न
एक्सवर केलेल्या पोस्टच्या सुरुवातीला अंजली दमानिया म्हणाल्या की, “वाल्मिक कराड याच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’ असे कधीच म्हणाला नसता.”
“दमनिया यांनी पुढे लिहिले की, “आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पहावी ही विनंती. त्याच्यावर याच गुन्ह्यात झालेला एफआयआर देखील आपण पहावा. आपल्याला माझे काही प्रश्न आहेत.”
१. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
२. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
३. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
४. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड याचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का ?
५. आवादा कंपनीच्या लोकांनी केलेला एफआयआर खोटा आहे का ?
६. गोट्या गित्ते सारखी माणस सदगृहस्त आहेत का ?
एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…
“एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ हा चित्रपटही आपण बघा. एका वाया गेलेल्या मुलाबरोबर, आईने काय करायला हवं, ते हे त्यामध्ये आपण पाहा. संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही?”, असे दमानिया यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.