Walmik Karad बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. दरम्यान न्याय मिळावा म्हणून मस्साजोगचे गावकरी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. तसंच आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई केली जावी ही मागणी करण्यात आली आहे. ही कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊ.

३०२ चा गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल करण्याची मागणी

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर ३०२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा, म्हणजेच हत्येचा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. इतकंच नाही तर, सीआयडी आणि पोलिसांकडून तपासाबाबत आम्हाला माहिती दिली जात नाही, योग्य दिशेने तपास सुरू आहे का? हेही आम्हाला समजत नाही. माझ्या भावाप्रमाणेच माझ्याही जिवाला धोका आहे, मग मीच स्वत:ला संपवून घेतो, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावातील टाकीवर चढून आज आंदोलन केलं.

मनोज जरांगेंच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे

धनंजय देशमुख यांनी आत्महत्येचा इशारा दिला. ज्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आले. जरांगे यांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. यावेळी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त मस्साजोग गावात पाहायला मिळाला. तर, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही गावात आले होते. पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधला असता खंडणीतील आरोपींवर ३०२ चा गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न विचारला असता कॉवत यांनी बोलणं टाळलं.

हे पण वाचा- Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”

वाल्मिक कराडवर ३०२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल होणार का?

वाल्मिक कराडवर कलम ३०२ च्या अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला जाईल का? असा प्रश्नही एसपी कॉवत यांना विचारला होता. संतोष देशमुख यांच्या पत्नीने सीआयडीकडे जबाब दिला असून जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आहे, त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती, असेही त्यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी बीडच्या नवीन एसपींना प्रश्न विचारला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे, त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही. मी तपासाबाबत काहीही सांगू शकत नाहीत, उद्या सीआयडीचे प्रमुख येथे येणार आहेत, असं उत्तर कॉवत यांनी दिलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

खंडणीतले जे आरोपी आहेत त्याबाबत एकच सांगणं आहे की खंडणीमुळेच हत्या झाली आहे. सामान्य शेतकऱ्यांनाही हा विषय कळतो तर तुम्ही तर अनुभवी मुख्यमंत्री आहात. खंडणीमुळेच हत्या झाली आहे. खंडणीतल्या आरोपीला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाहीतर काय करणार? खंडणीमुळे खून झाला आहे, त्या आरोपीला ३०२ मध्ये घ्या अशीही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या प्रकरणात चुकीचं पाऊल पडलं आहे त्यामुळे आम्हाला आता यात उतरावं लागतं आहे. अजून पोलिसांना फेकलेला मोबाइल कसा सापडत नाही? त्या मोबाइलमध्ये बरेच पुरावे आहेत असंही कळलं आहे. अनेक लोक त्यात गुंतणार आहेत असं दिसतंय. खंडणीतला जो आरोपी वाचवू पाहात आहात, खंडणीतला आरोपी तुमचं सरकार चालवतो आहे का? असा प्रश्न मनोज जरांगेंनी विचारला. खंडणीतला आरोपी मोदींपेक्षा मोठा आहे का?

Story img Loader