Walmik Karad : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. दरम्यान या प्रकरणात ज्याचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं तो वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आला आहे. ज्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातल्या एकाही आरोपीला सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान सीआयडीचे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराडच्या शरणागतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सारंग आव्हाड?
आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केस पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी एफआयआर नंबर ६३८/२०२४ मधील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी मुख्यालयात हजर झाला आहे. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलं असून त्याची थोडीफार चौकशी करुन त्याला बीडकडे रवाना करण्यात आले आहे. आरोपी वाल्मिक कराडच्या बरोबर आमच्या टीमसह बीडचे तपास अधिकारीही आहेत. बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता बंदोबस्तात बीडकडे रवाना करण्यात आलं असल्याचं सारंग आव्हाड यांनी सांगितलं. तसेच, पुढची तपासणी गुजर हेच करतील, असेही त्यांनी म्हटलं आहे. सीआयडीचे डीवायएसपी आहेत त्यांच्या ताब्यात फरार आरोपीला देण्यात आलं आहे असंही आव्हाड यांनी सांगितलं.
हे पण वाचा- वाल्मिक कराड शरण येणे हे पोलिसांचे अपयश, फडणवीसांच्या मर्यादा स्पष्ट, कॉंग्रेसचा आरोप
वाल्मिक कराड यांनी व्हिडीओ पोस्ट करत काय म्हटलं आहे?
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, फार काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही. त्याचं समर्थन करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधाकांनी राजकारण करत राहावे. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.