केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड प्रक्रिया राबवली जाते.या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यपातळीवरून निवडलेल्या पोलीस ठाण्यांच्या यादीत पाच पोलीस ठाण्यांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये मराठवाड्यातील दोन पोलीस ठाण्यांचा समावेश असून, औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या वाळूज पोलीस ठाण्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याने राज्यात तिसरे स्थान मिळवले आहे.
२०१६ मध्ये डीजीएसपी व आयजीएसपी परिषदेमध्ये गुन्ह्यांच्या तपास, कायदा व व्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी यामध्ये सुधारणा ठेवून निकोप स्पर्धा वाढावी यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याचा निर्णय केंद्रीयस्तरावर घेण्यात आला. यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्यात येते.
या स्पर्धेत समावेश व्हावा, यासाठी राज्यपातळीवरूनही सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्यांची निवड केली जाते. त्यासाठी निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली आदी बाबींचा विचार करून त्यापैकी २ सर्वोत्कृष्ट ठाणे निवडण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती, तसेच परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्तांनी घटकनिहाय, परिमंडळनिहाय प्राप्त प्रत्येकी दोन पोलीस ठाण्यांमधून परिक्षेत्र, आयुक्तालय स्तरावर उत्कृष्ट दोन पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी परिक्षेत्रीयस्तरीय समिती आणि परिक्षेत्र निहाय प्राप्त उत्कृष्ट ठाण्यांमधून ५ सर्वोत्कृष्ट ठाणे निवडण्यासाठी समित्या गठित करण्यात आल्या होत्या.
ग्रामसुरक्षा दलामुळे चोरीच्या घटनांमध्ये घट –
वाळूज पोलीस ठाण्यांतर्गत ४० गावे येतात. या गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन केले असून त्याद्वारे गस्त घालण्यात येते. परिणामी चोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. गावांमधील पोलीस पाटील पदाच्या व्यक्तीशी समन्वय ठेवण्याने लहान-मोठ्या घटनांची माहिती मिळू लागली. ज्येष्ठ, महिलांच्या तक्रारींचा प्राधान्याने निपटारा केला. १९६२ पासूनच्या प्रलंबित प्रकरणांचा तपास केला. संगणकीकरण, इमारतीचे नूतनीकरणासह इतरही सुविधा निर्माण करून कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.
यवतमाळमधील बाभुळगाव दुसरे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे –
राज्यभरातून निवडलेल्या या सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत दुसरे स्थान यवतमाळातील बाभुळगाव, चौथे सोलापूर शहरातील जोडभावी ठाणे तर पाचव्या स्थानी अहमदनगरमधील राजूर पोलीस ठाणे राहिले. यासंदर्भातील माहिती राज्याचे अप्पर पोलीसमहासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी जाहीर केली आहे.