आबांना निवडून आणण्याची जबाबदारी वाळव्याने घेतली असल्याचे शुक्रवारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पंचायत समितीच्या कार्यक्रमात जाहीर करून जिल्ह्य़ाला दोघांत मतभेद नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले. एकेकाळी इफ्तार पार्टीत एकमेकांना खजूर भरवून मतभेद संपल्याचे जाहीर करणा-या या जोडीला राष्ट्रवादीतील गळती रोखण्याचे आता सुचले असून रेडीमेड पुढाऱ्यापेक्षा कार्यकर्त्याना ताकद देण्याचा विडा दोघांनी उचलला आहे.
आर. आर. आबांना राष्ट्रवादीचा राज्यभर प्रचार करता यावा, त्यांना तासगाव -कवठे महांकाळमध्ये गुंतून राहावे लागू नये यासाठी त्यांच्या विजयाची जबाबदारी वाळव्याने घेतली असल्याचे जयंतराव पाटील यांनी जाहीर केले. यापूर्वीही हे दोन नेते एकाच पक्षाचे काम करीत असतानाही त्यांच्याच पक्षाच्या खा. संजयकाका पाटील यांच्यापासून अजितराव घोरपडे व्हाया जतचे विलासराव जगतापपर्यंत सर्वांनीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधोगतीला केवळ आबाच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
लोकसभेच्या निवडणुकीत आबांनी आघाडी धर्म म्हणत कॉंग्रेसच्या प्रतीक पाटील यांच्या विजयासाठी जिल्ह्य़ात तळ ठोकला होता. एका अर्थाने लोकसभेची झालेली निवडणूक आबा विरूध्द राष्ट्रवादीतील त्यांचे विरोधक अशीच होती. याचा लाभ भारतीय जनता पक्षाला झाला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पुन्हा हे सारे एकत्र आले आहेत. लोकसभेवेळी ऐनवेळी भाजपाला भरभरुन मतांचे दान करण्यासाठी पुढे सरसावलेले कार्यकत्रे कोणाचे होते हे अवघ्या जिल्ह्य़ाला ज्ञात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा