अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये मोठमोठे खुलासे सीबीआयने केले आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्यासाठी बनाव रचला होता. या बनावात समीर वानखेडेंचाही सहभाग असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे. हा बनाव कसा रचला याप्रकरणीही सीबीआयने एफआयआरमध्ये नोंदवलं आहे.
“बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी उकळण्याची योजना आखली होती”, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये केला आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी यांनी २ ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईतील कॉर्डियल क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम मारीजुआना, २२ एमडीएमएच्या गोळ्या आणि १.३३ लाखांची कॅश जप्त करण्यात आली होती. तसंच, आर्यन खानसह १७ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
हेही वाचा >> “आर्यन खानप्रकरणात २५ कोटी उकळण्याचा डाव”, समीर वानखेडेंच्या एफआयआरमध्ये सीबीआयचा मोठा खुलासा
“याप्रकरणी समीर वानखेडे, एनसीबीचे अधिक्षक विश्वविजय सिंह, मुंबई झोनल युनिटचे गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद, के. पी. गोसावी आणि सॅनविले डिसोझा आणि इतर लोकांविरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला. तसंच, १२ मे रोजी सीबीआयने मुंबई, दिल्ली, रांची, लखनऊ, चैन्नई आणि गुवाहाटी येथे एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली”, अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
“एनसीबी दक्षता शाखेतील अधिक्षक कपील यांच्या माहितीवरून ही तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. क्रूझवर अटक करण्यात आलेल्या कथित आरोपींना एनसीबी कार्यालयात घेऊन जाण्यासाठी के. पी. गोसावीच्या गाडीचा वापर करण्यात आला होता. तसंच, के. पी. गोसावी हा एनसीबीचाच अधिकारी आहे, असं भासवण्याकरता त्याला आरोपींच्या आजूबाजूलाच ठेवण्यात आलं होतं. गोसावीला सतत आरोपींच्या सहवासात ठेवण्यात आलं. तसंच, त्याला एनसीबी कार्यालयातही येण्याची परवानगी देण्यात आली होती. हे नियमांच्या विरोधात होतं. त्यामुळे के. पी. गोसावी याने याचा गैरफायदा घेतला आणि आरोपींसोबत सेल्फी घेत त्यांचे व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केले”, असंही या सीबीआयने एफआयआरमध्ये नोंदवलं आहे.
या सर्व प्रकारामुळे के. पी. गोसावी आणि डिसोझा यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास संधी मिळाली. त्यामुळेच त्यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची मागणी करण्याचं ठरवलं. अखेर वाटाघाटी होऊन १८ कोटींचा व्यवहार ठरला. यापैकी टोकन म्हणून ५० लाखही देण्यात आले होते. परंतु, ही रक्कम पुन्हा परत देण्यात आली.
हेही वाचा >> Aryan Khan Case : समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नी क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
“समीर वानखेडे यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांचे योग्य तपशील दक्षता शाखेला दिले नव्हते. तसंच, परदेश दौऱ्यांचे स्त्रोतदेखील जाहीर केले नाहीत. तसंच, समीर वानखेडे यांनी महागड्या घडाळ्यांचीही खरेदी विक्री केली आहे”, असंही या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे.