छत्रपती संभाजीनगर : मुलगी मानल्याचा आभास निर्माण करून देत घरातच राहणाऱ्या विद्यार्थिनीवर विद्यापीठातील प्राध्यापकाने वारंवार बलात्कार केला आहे. अत्याचाराची माहिती प्राध्यापकाच्या पत्नीला दिली असता तिनेही, तुझ्यापासून मुलगा हवाय, असे सांगत गुन्ह्यास पाठबळ दिल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री प्राध्यापकासह त्याच्या पत्नीविरोधात बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रा. अशोक गुरप्पा बंडगर व पल्लवी अशोक बंडगर (दोन्ही रा. विद्युत कॉलनी बेगमपुरा छत्रपती) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती बेगमपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक तावरे यांनी दिली. प्रा. अशोक बंडगर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात शिकवतो. तर ३० वर्षीय पीडिता फाईन आर्टच्या दुसर्या वर्षातील विद्यार्थिनी आहे.
मूळची बुलढाणा जिल्ह्यातील असलेली पीडिता शहरात शिक्षणासाठी आली होती. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतल्यानंतर पीडितेने राहण्यासाठी जागा शोधत होती. प्राध्यापकाच्या ओळखीतून विद्युत कॉलनीत भाड्याने खोली घेण्याचा विचार बोलून दाखवला. तेव्हा अशोक बंडगर याने त्याच्या घरातच आश्रय घेण्याचा विचार मांडला. त्यासाठी पत्नीची अनुमती असल्याचंही सांगितले. विद्यार्थिनी मुलीसारखी असते, असाही आभासी आदर्श विचार बोलून दाखवत असे. त्यातून विश्वास संपादन केला.
११ फेब्रुवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२३ ची संध्याकाळ, या वर्षभरात विद्युत कॉलनीतील घरामध्ये जवळीक निर्माण करुन, छेडछाड करुन इच्छेविरुद्ध वेळोवेळी शिवीगाळ करून, धमकी देवून पीडितेसोबत प्रा. बंडगर याने शारीरिक संबंध ठेवले. त्याबाबत पीडितेने पल्लवी अशोक बंडगर हीस सांगितले असता ते मला मान्य असल्याचे सांगत गुन्ह्यासाठी उत्तेजना दिली. शिवाय, “तुझ्यापासून आम्हास मुलगा पाहिजे आहे” म्हणून दोन्ही आरोपींनी पीडितेसोबत अत्याचाराचे प्रकार वेळोवेळी केले, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रा. अशोक बंडगर व पल्लवी बंडगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक विद्यार्थिनींच्या तक्रारी
प्रा. अशोक बंडगर विरुद्ध यापूर्वीही काही विद्यार्थिनीनी विशाखा समितीकडे तक्रारी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तक्रार देणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रकरणावर विद्यापीठ काय भूमिका घेते, याबाबतचे चित्र एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.