दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही निवडणुकीत भाजपला साथ दिली. आमच्या पाठिंब्यामुळेच राज्यात सत्तांतर झाले. मात्र, सत्ता येऊन एक वर्ष होत आले असताना घटक पक्षांना सत्तेत वाटा देण्याबाबतचा शब्द पाळला जात नाही. यापुढे आम्ही भीक मागणार नाही, तर एकजुटीतून ताकद वाढवून तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा निर्वाणीचा इशारा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षाचे नेते महादेव जानकर रामदास आठवले राजू शेट्टी आणि विनायक मेटे यांनी नागपूर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात येऊन दिला.
निमित्त होते राष्ट्रीय समाज पक्षाच्या १२ व्या वर्धापन दिनाचे. नागपुरातील देशपांडे सभागृहात आज, शनिवारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. पंकजा मुंडे आणि बावनकुळे या दोघांचा अपवाद सोडला तर इतरांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. मुंडे या भाषण करून निघून गेल्या, तर बावनकुळे काहीच वेळ व्यासपीठावर होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समाज पार्टीने महायुतीबाहेरच्या रिपाई (गवई) लाही निमंत्रित केले होते. पक्षाचे नेते डॉ.राजेंद्र गवई उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी भाषणात घटक पक्षांनी एकी कायम ठेवावी, त्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. भाषण देऊन त्या निघून गेल्याने काही नेते संतापले. ऐकणारे नेते भाषण देऊन गेल्याने आता बोलायचे कशाला?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
केवळ युतीचे -मेटे
राज्यात सत्ता महायुतीची नाही तर फक्त भाजप-सेना युतीचे आहे. महायुतीतील घटक पक्षांना काहीच महत्त्व दिले जात नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, असे मेटे म्हणाले. पंकजा मुंडे यांनी घटक पक्षांना न्याय देणार, असे सांगितले होते. त्याकडे लक्ष वेधताना मेटे म्हणाले की, आम्हाला वाटा हवा आहे. घटक पक्षांना दिलेला शब्द भाजपने पाळावा सन्मान होणार नसेल तर वेगळा विचार करावा लागेल, असे मेटे म्हणाले.

भीक मागणार नाही -जानकर
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपसोबत आलो. आमच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला जागा मिळाल्या. मुंडे गेल्यानंतर त्यांचे शिष्य व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कन्या पंकजा मुंडे यांच्यावर आमचा विश्वास होता, पण सत्ता आल्यावरही आमची दखल घेतली जात नसल्याने किती काळ विश्वास ठेवायचा, याचा विचार करावा लागेल. आम्ही भीक मागणार नाही. आमची ताकद दाखवून देऊन तुम्हाला इंगा दाखवू.

बहीण आणि मोठा भाऊ!
कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांनी जानकर यांना राखी बांधली, तसेच फडणवीस जानकर यांना मोठे बंधू मानतात. याचा उल्लेख जानकर यांनी त्भाषणात केला. बहीण आणि भावांकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र, तेच गळा कापायला निघाले आहेत, असे ते म्हणाले.

.. तर पळता भुई थोडी होईल -राजू शेट्टी
महायुतीतील घटक पक्ष सध्या थट्टेचा विषय झाले आहेत. प्रत्येकाला सन्मान असतो, तो जपायलाच हवा. त्याला कोणी धक्का देणार असेल तर पळता भूई थोडी करण्याची ताकद आमच्यात आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी म्हणाले. साधी मुंगी सुद्धा हत्तीला जेरीस आणू शकते, हे गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवामुळे दिसून आले. भाजपने याचे भान बाळगावे. देशात अच्छे दिन येणार, असे सांगण्यात आले होते, पण ग्रामीण भागात ते कोठेच नाही. त्यामुळे आता संघर्षांसाठी तयार राहा, असे शेट्टी म्हणाले.

..तर काय करायचे ते ठावूक -आठवले
सत्तेत वाटा मिळावा यासाठी आम्ही आग्रही नाही, पण तो मिळाला नाही तर काय करायचे, हे आम्हाला चांगले ठावूक आहे, असे रामदास आठवले म्हणाले. आमच्या पाठिंब्याची भाजपला राज्यात आणि केंद्रात गरज नाही, हे जरी सत्य असले तरी आम्हाला डावलून चालणार नाही, याकडे आठवले यांनी लक्ष वेधले.