Waqf Amendment Bill वक्फ सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत १२ तास चर्चा झाली. त्यानंतर आता राज्यसभेत चर्चा सुरु आहे. दरम्यान या विधेयकावरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. आज तर त्यांनी काही सातबारे रामाच्या तर काही विठ्ठलाच्या नावावर आहेत असंही म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“पंडीत नेहरुंची परदेश नीती चर्चेत होती. आम्ही कोणत्याही राष्ट्राचे गुलाम होणार नाही हे त्यांचं धोरण होते. रशिया आणि अमेरिका यांच्यापासून नेहरु दोन हात लांब राहिले. त्यामुळे परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हटलं जातं. वक्फवरुन सध्या खोटं बोललं जातं आहे. वक्फची जमीन कुणाचीही जमीन नाही. या जमिनी दानात दिल्या गेलेल्या जमिनी आहेत. राजे-महाराजांच्या जमिनी आहेत. त्या वक्फ झाल्या आहेत.

आपल्याकडे काही सातबारे विठ्ठलाच्या नावावर, काही रामाच्या नावावर-आव्हाड

आपल्याकडे देवस्थानांच्या जमिनी आहेत, काही सातबारे विठ्ठलाच्या नावावर आहेत, काही रामाच्या नावावर आहेत. काही पांडुरंगाच्या नावावर आहेत. या देवस्थानांच्या जमिनी आहेत. त्यांची विल्हेवाट लावता येत नाही. अर्थात महाराष्ट्रात देवस्थानाच्या जमिनी खाल्ल्याचेही प्रकार महाराष्ट्रात घडले आहेत. कुणी त्या जमिनी खाल्ल्या आहेत ते सगळ्यांना माहीत आहेत. देवस्थानांच्या जमिनींची लूटमार कुणी केली ती नावंही आम्ही सांगू. आमचे हात स्वच्छ आहेत त्यामुळे आम्ही हे बोलू शकतो असंही आव्हाड म्हणाले.

वक्फ बोर्डाच्या जमिनी समजून घ्या-आव्हाड

वक्फ बोर्डाच्या जमिनी समजून घ्या, या जमिनी श्रीमंत मुस्लिमांनी आपल्या समाजाच्या हितासाठी, धर्मकार्यासाठी, शिक्षणासाठी आणि गरीब मुस्लिमांचा फायदा व्हावा या उद्देशाने दिलेल्या जमिनी आहेत. या काही सरकारने त्यांना कधीकाळी दिलेल्या जमिनी नाहीत. त्यांच्या जमिनी आहेत तर आहेत. ताजमहाल वक्फची जमीन आहे. सरकारकडून अपेक्षा काय असते? तर ज्या जमिनी दान दिल्या आहेत त्या कुणी खाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना रोखलं पाहिजे. कुठल्याही धर्माच्या जमिनी राखून ठेवल्या पाहिजेत आणि त्या समाजहितासाठीच वापरल्या पाहिजेत असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. देशात धर्मद्वेष इतका पेरतो आहोत की त्यासाठी सगळी माध्यमं कमी पडू लागली आहेत. आपल्याला यादवीकडेच देश न्यायचं असेल तर कोण काय करणार? असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंं आहे.