करोनानं मृत पावलेली महिला अनेक व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने या सर्व लोकांची माहिती घेण्यासाठी प्रशासनाने १५ चमू गठीत केला आहे. संसर्गाचे कारण मृत महिलेची नातलग असलेली परिचारिका असल्याबाबत तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा दोन दिवसापूर्वी झालेला मृत्यू करोनाने झाल्याचं आज स्पष्ट झालं. ही महिला दम्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी आर्वीतील एका खासगी दवाखन्यात व नंतर उपजिल्हा रूग्णालयात गेली होती. हे दोन्ही दवाखाने विलगीकरणासाठी त्वरीत बंद करण्यात आले. अंत्यसंस्कारप्रसंगी तीनशेवर लोकं उपस्थित होते. त्या सर्वांची नोंद घेणे सुरू झाली आहे. तसेच मृत्यूपूर्वी ही महिला विविध ठिकाणी वावरल्याने त्याचा तपास करण्याचे अवघड आव्हान प्रशासनापुढे उभे झाले आहे.

त्यासाठी आरोग्यसेवकासह विविध व्यक्तींच्या १५ चमू गठीत करण्यात आल्याची माहिती आर्वीत तळ ठोकून असलेले जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. परिसरातील सात गावात नाकाबंदी करण्यात आली आहे. लगतच्या तरोडा गावातील काही लोक अंत्यसंस्कारास गेले असल्याने या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत महिलेला कुठल्या माध्यमातून संसर्ग झाल्याची बाब तपासणीत अग्रभागी आहे. या महिलेची एक परिचारीका असलेली नातलग तिला भेटण्यासाठी गावात आली होती. त्या पैलूने सदर परिचारिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रशासनास कळविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha corona infected dead woman came in contact with several the administrations run aau