जेवण आटोपून शतपावली करणाऱ्या दाम्पत्यास वन विभागाच्या वाहनाने धडक दिली. यात शिक्षक पती ठार तर पत्नी थोडक्यात बचावली. कारंजा घाडगे येथे गावातून जाणाऱ्या गवंडी रस्त्यावर हा अपघात रात्री दहा वाजता घडला.
भोजराज आत्माराम गाखरे (५०) रात्री जेवण आटोपून नेहमीप्रमाणे पत्नी उषासह शतपावली करण्यास घराबाहेर पडले. त्याच वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या वन विभागाच्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात भोजराज यांचा जागीच मृत्यू झाला, पत्नीचे दैव बलवत्तर म्हणून त्या बचावल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
अपघातासमयी वाहनचालक राजू उईके हा मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर वेगात असलेले वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन आदळले. त्यानंतर वाहनचालक वाहन सोडून पळाला आणि थेट पोलीस ठाण्यात हजर झाला.