नवी मुंबईतील 3 वर्षांचा चिमुकला त्याची आई व काका आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील आई व मुलगी अशा एकूण 5 व्यक्तींनी आज करोनावर मात करत, रुग्णालयाबाहेरचा मोकळा श्वास घेतला. उपचारा पश्चात्य या हसऱ्या चेहऱ्यांना यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून निरोप दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे आलेल्या तीन व्यक्तींना करोनाची लागण झाल्यामुळे, सेवाग्राम येथील कोविड रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत असलेला तीन वर्षांचा चिमुकला देखील कोरोनाबाधित होता. त्यांच्यावर 14 दिवस उपचार केल्यावर त्यांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मात्र पुन्हा दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या चाचणीत ते कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल मिळाला. त्यामुळे आज त्यांना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयात अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील मेंदूज्वराच्या आजारासाठी दाखल झालेल्या तरुणीसोबत तिच्या दोन बहिणी व आई सुद्धा कोरोनाबाधित झाल्या होते. त्यापैकी आई आणि एका बहिणीचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आल्यामुळे त्यांनाही आज घरी सोडण्यात आले.

यावेळी सावंगी येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सावंगी मेघे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अभ्युदय मेघे, रुग्णालयातील डॉक्टर यांनी बऱ्या झालेल्या रुग्णाला प्रमाणपत्र आणि शुभेच्छापत्र देऊन निरोगी राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. उपचार करणाऱ्या डॉक्टरांमध्ये सावंगी येथील डॉ संदीप श्रीवास्तव, ललित वाघमारे, चंद्रशेखर महाकाळकर, सुनिल कुमार, हेमंत देशपांडे, विठ्ठल शिंदे, माधुरी ढोरे इत्यादी डॉक्टरांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha five people including three year old boy corona free msr