वर्धा : राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याला राज्यातील बहिणींचा लाभलेला उत्स्फुर्त प्रतिसाद चांगलाच चर्चेत आहे. शासकीय कार्यालयात महिला वर्गाच्या उसळलेल्या गर्दीने इतर कामे ठप्प पडल्याचे चित्र दिसून येते. आता राज्याच्या लाडकी बहीणपाठोपाठ काँग्रेसने महालक्ष्मी योजना पुरस्कृत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने तयार केलेल्या न्यायपत्रात या महालक्ष्मी योजनेचा उल्लेख आहे. त्यात प्रत्येक महिलेला वार्षिक एक लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. देशातील गृहिणींना महागाईने हैरान केले आहे. त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. महालक्ष्मी योजना देशात लागू करून महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच महिलांना ३३ टक्के आरक्षण आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी लागू करावे, राजकीय भागीदारी मिळावी, महिलांवरील अत्याचार थांबवावे व अन्य मागण्या चारुलता टोकस व जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे यांनी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले हे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना श्रीमती मेघे व महिला सहकाऱ्यांनी दिले.

हेही वाचा – चंद्रपूर : स्वयंपाक झाला, ताटं वाढली, जेवायला बसणार इतक्यात थेट बिबट्याच माजघरात….

नदीपात्रात उडी घेण्यास उभी राहताच….

मानसिक स्थिती बरोबर नसताना एका महिलेने पवनार येथील नदीच्या पात्रात उडी घेण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तिचा जीव वाचला. सावंगी परिसरात राहणाऱ्या सुलोचना ही मानसिक स्थिती योग्य नसताना घराबाहेर पडून पायी फिरली. थेट पवनार गाठून नदी पात्रालगत बसली. उडी घेण्यास उभी राहताच सहायक पोलीस उपनिरीक्षक विनीत घागे व मारोती काटकर यांनी तिला रोखले. ती वाचली. विचारपूस केल्यावर तिने सावंगीत राहणारी असल्याचे सांगितल्यावर पोलीस पोहोचले. पण ती काहीच बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांच्या सखी वन स्टॉप सेंटर येथे पाठविण्यात आले. इकडे तिचा पती शोध घेत सावंगी पोलिसांकडे पोहोचला. पत्नी कुणासही न सांगता घरून निघून गेल्याचे तसेच तिची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे नमूद केले. अखेर सखी सेंटरवर गाठ पडली.

हेही वाचा – काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी कायमच! खासदारांच्या सत्कार सोहळ्याकडे शहराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची पाठ

विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

तळेगावलगत भीष्णूर येथील राजेश भीमराव नांदणे ४२, यांचा विजेचा धक्का लागून शेतातच मृत्यू झाला. पावसाने थोडी उसंत दिल्यावर स्वतःच्या दोन एकर शेतीत पत्नीसह ते पोहोचले. काम करीत असताना ते अचानक कोसळले. पत्नी ओरडल्यावर इतर शेतकरी, मजूर धावून आले. तेव्हा राजेश यांच्या हातात विजेची तार दिसून आली. त्यांच्या अंगातून धूर निघत असल्याचे दिसून आले. जागीच मृत्यू ओढवला होता. गावात या कष्टाळू शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha ladki bahin of mahayuti and mahalakshmi of congress find out whats special pmd 64 ssb