जिल्ह्य़ातील बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्याने प्रमुख पक्ष नेत्यांनी राजकीय निष्ठा खुंटीला टांगून चालविलेल्या राजकारणाने पक्ष कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.
वर्धा, देवळी व आर्वी बाजार समित्यांच्या निवडणुका पुढील आठवडय़ात होत असून, सेलू-सिंदी बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजप, कांॅग्रेस व राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार या निवडणुकीत उतरले असून, व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून राजकीय पक्षाच्या निष्ठा वेशीवर टांगली गेल्याचे चित्र आहे. खासदार रामदास तडस, आमदार व माजी मंत्री रणजित कांबळे, माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख, आमदार डॉ.पंकज भोयर व अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, तसेच जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती कामाला लागले आहेत. वर्धा व देवळीत कांबळे-देशमुख युती असून, देशमुख गटाच्या फि तूर व फु टिरांसह खासदार रामदास तडस या दोन बाजार समित्यांमध्ये सत्तापालट करण्यासाठी जंग जंग पछाडत आहे. भोजनावळी रंगात आल्या असून, काही सदस्यांचे भावही गगनाला भिडले आहेत.
इकडे सेलू-सिंदीत वेगळेच चित्र उमटले. कट्टर परस्पर विरोधक असणारे प्रा.देशमुख व शेखर शेंडे एकत्र आले आहेत. या ठिकाणी देशमुख ६, जयस्वाल ५, तर शेंडे ४, असे मिळून १५ जागा लढणार आहेत. सहा महिन्यापूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देशमुख-शेंडे परस्पर विरोधात उभे ठाकले होते. सुरेश जयस्वाल यांनी देशमुखांचा हात सोडत शेंडेंना ताकद दिली. वस्तूत: जयस्वाल हे अनेक तपापासून सहकार गटाशी जुळलेले आहेत, पण गटनेते प्रा.देशमुख यांच्या सूतगिरणीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत जयस्वालांनी शेंडेंशी हातमिळवणी केली. ज्या शेंडे-जयस्वाल यांचे सर्वच तऱ्हेचे वैर जिल्ह्य़ाने वर्षांनुवर्ष पाहिले. आता त्याच शेंडेंना घेऊन जयस्वाल यांनी देशमुखांशी राजकीय सोयरीक केली आहे. जयस्वालांचे बंधू माजी जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल व डॉ.राजेश जयस्वाल यांनीच वाटाघाटी केल्या. भाजपला दूर ठेवण्यासाठी हे एकत्र आले. मजेशीर बाब म्हणजे, त्याच भाजपसोबत सहकार गटाने वर्धा पालिकेत युती करून सत्तारोहण केले आहे.
प्रा.देशमुख यांचे बंधू शरद देशमुख हे वर्धा बाजार समितीचे अध्यक्ष असून त्यांचा येनकेन प्रकारे पराभव करण्यासाठी भाजप नेत्यांनी सहकार गटाच्याच काहींना हाताशी धरले आहे. कळस म्हणजे, भाजपचे कर्तेधर्ते सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या ताब्यातील हिंगणघाट बाजार समितीसारखी मॉडेल बाजार समिती निर्माण करण्याचे आश्वासन प्रचारात देत आहेत. या आघाडय़ा होण्यापूर्वी भाजप नेत्यांनी सहकार गटाकडे मैत्रीचा गळ टाकून पाहिला, पण कांबळेंना देशमुखांनी प्राधान्य दिले. दत्ता मेघेंचाही एक पैलू आहेच. कांबळे-देशमुखांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा विडा उचलणाऱ्या मेघेंकडेही भाजप नेते जाऊन ताकद घेऊन आले व कामाला लागले. आर्वीत दिलीप काळेंच्या सोबतीला त्यांचे परंपरागत वैरी आमदार अमर काळे मदतीला धावले आहेत. येथे दिलीप काळेंचे राजकीय सहकारी श्रीधर ठाकरे यांचे अमर काळेंशी उभे वैर आहे. एकूणच या निवडणुकीत सहकार गटाचे अस्तित्व पणाला लागले आहे. प्रकृतीची चिंता न करता प्रा.देशमुख यांनी मैत्रीभाव पुढे करून भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. राजकीय आयुष्यातील ही निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात प्रतिष्ठेची ठरत आहे. आमदार कांबळेंनी उमेदवार निवडून मौन बाळगले आहे, तर भाजप नेत्यांना गमावण्यासारखे काहीच नसल्याचे त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे म्हणून शिवसेनेला तर त्यांनी एका शब्दानेही विचारले नाही.

Story img Loader