प्रशांत देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेघे अभिमत विद्यापिठाच्या पूजा व्यास अविरत प्रयत्नानंतर अंतिम फेरी गाठून आता आंतरराष्ट्रीय सौदर्यवतीचा किताब पटकाविण्यासाठी सज्ज झाल्या आहे. जिइओ समूहातर्फे ‘मिस,मिस्टर आणि मिसेस’ अशा तीन गटातून ही स्पर्धा होत आहे. पूजा व्यास यांनी आयोजक समूहाच्या ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’व ‘मिसेस इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन’ अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दोनही स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली आहे. ९ मे रोजी मुंबईत राष्ट्रीय व १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोलकता येथे होणार आहे.

मेघे विद्यापिठात प्रशासकीय अधिकारी असलेल्या पूजा व्यास यांनी औषधी निर्माणशास्त्र व विधी शाखेत पदव्यूत्तर पदवी घेतली असून लवकरच त्यांना पीएचडी पदवी मिळणार आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांना वेगळे काही करून दाखविण्याची उर्मी होती. सौदर्यवती स्पर्धा त्या आवर्जून बघत. मात्र अत्यंत परंपरानिष्ठ समाज व कुटूंबातून आल्या असल्याने या वेगळ्या वाटेवर चालण्याची बाब धाडसाचीच ठरली. मात्र पती तसेच अदविका व निर्वाणी या दोन कन्यांचे प्रोत्साहन पूरक ठरले.

घरातून पाठबळ मिळाल्यानंतर नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलच्या डॉ.वर्तिका पाटील यांनी स्पर्धेचा मार्ग दाखविला. संस्थेचे सागर मेघे यांनी सर्व ते सहकार्य करण्याची दिलेली हमी तसेच अधिष्ठाता डॉ. संदिप श्रीवास्तव यांनी कार्यालयीन सवलतीसह दिलेले मार्गदर्शन पूजा यांना बळ देणारे ठरले. देवेंद्र व्यास यांनी तयारी करवून घेतली. ही नावे मला अंतिम फेरी गाठण्यास मोलाची ठरल्याचे पूजा व्यास आवर्जून नमूद करतात.

“एका आईसाठी कुटूंब व कार्यालय सांभाळून आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग चांगलाच खडतर प्रवास ठरतो. कारण केवळ सौदर्य हाच एक निकष नसतो. तुम्हाला तुमचे वेगळेपण सिध्द करावे लागते. वैचारिक जडणघडण दिसून येते. संवादशैली, शब्दफेक,देहबोली, आवडीनिवडी व अन्य पैलूंनी पारख होते. वर्षभर झालेल्या वेगवेगळ्या फेरीतून स्वत:ला सिध्द करावे लागले. आज अंतिम फेरीच्या उंबरठयावर त्यामुळेच येवू शकले,” असे पूजा व्यास म्हणाल्या.

राष्ट्रीयच्या सुनिता भगत व आंतरराष्ट्रीयच्या सुकन्या गुप्ता यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. महानगरातील स्पर्धकांना तयारीसाठी सर्व त्या सोयी हाकेसरशी उपलब्ध असतात. मात्र वर्धेसारख्या लहान गावात अश्या स्पर्धांसाठी तयारी करण्याची बाब फार कष्टदायी ठरत असल्याचा त्यांचा अनूभव राहिला. कोविड काळातील बंधने अडचणीची ठरली. मात्र स्त्री सबलीकरण कार्यात झोकून देण्याचा मानस ठेवणाऱ्या पूजा यांना या सर्व अडचणी दूर करीत महिलांपूढे आदर्श ठेवायचा होता. या दोन्ही स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या त्या विदर्भातील एकमेव ‘आई’ आहेत. आपण ही स्पर्धा जिंकूच, असा विश्वास त्या व्यक्त करतात. तर त्यांचे प्रेरणास्थान असलेले डॉ.श्रीवास्तव म्हणतात की पूजा व्यास या आमच्या समूहाचे नाव निश्चितच उंचावतील.