टाळ विठ्ठल, नाद विठ्ठल.. विठ्ठलचि अवघ्या चराचरी.. ही भावना असलेला वारकरी पिढय़ान्पिढय़ा पंढरीच्या वाटेवर चालतो आहे. ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ असलेल्या त्या विठ्ठलाची अनोखी भक्ती त्याला आपोआपच वारीच्या वाटेवर घेऊन येते अन् चैतन्याची अनुभूती देते. अनेक कुटुंबांमध्ये वारी परंपरेनेच असते. एखादी वारी चुकली की ते शल्य वर्षभर मनाला बोचते. त्यामुळे शक्यतो वारी चुकविली जात नाही. हे शल्य असते चैतन्याच्या अनुभूतीतून मुकल्याचे. हेच चैतन्य त्याला त्याच्या दैनंदिन कामकाजाचे बळ देते. म्हणूनच वारकऱ्यांची वारी ही निखळ भक्तीची असते. मात्र सामाधानासाठी, उत्सुकतेसाठी अन् आरोग्यासाठीही वारी करणारा एक वर्ग वारीच्या वाटेवर पाहायला मिळतो.
उन्हाच्या तडाख्यात वारकऱ्यांची पावले झपझप पुढे पडत असताना एक वारकरी रस्त्यालगतच्या आंब्याच्या गर्द सावलीखाली खोडाला पाठ ठेकवून निवांत बसला होता. हातात पाच-सहा छोटे दगड घेऊन तो समोरच्या एका मोठय़ा दगडावर नेम साधत होता. आनंदी चेहऱ्याने त्याचा हा एकटय़ाचाच खेळ रंगला होता. मळलेला पायजमा, सुरकुत्या पडलेला शर्ट व डोक्यावर टोपी. चेहरा काहीसा तजेल वाटत होता. गर्द सावलीच्या ओढीने तिथे जाऊन सहज गप्पा माराव्या म्हणून, ‘‘काय, माउली कुठून आलात़,’’ अशी सुरुवात केली. त्यानंतर काही वेळ गप्पा रंगल्या.
त्याच्याशी बोलणे संपले तेव्हा अवाक् झालो. ते एक उद्योजक होते. ‘‘भक्तीतलं मला काही कळत नाही, पण वाटेवर आलं की समाधान मिळतं, वीस दिवस सर्व व्यवहार दुसऱ्याकडे सोपवून, अगदी मोबाईलही बंद करून वारीत येतो. वर्षभराची एनर्जी व समाधान घेऊन जातो.’’ असे सांगून ते उठले अन् पायजमा झटकून पुन्हा वारीच्या वाटेवर चालू लागले.
केवळ समाधान मिळते म्हणून अशा प्रकारे वारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पालखी सोहळ्याची सुरुवात होऊन अनेक शतके उलटली. वारकरी किंवा पालखी मार्गावर येणारी गावे वगळता हा सोहळा नेमका असतो कसा, हे अनेकांना माहीत नव्हते. कुणीतरी त्याबाबत केवळ वाचलेले असते. मात्र, मागील काही वर्षांपासून माध्यमांमध्ये वारी व पालखी सोहळ्याबाबत सविस्तर चित्रण येऊ लागले. वृत्तवाहिन्यांच्या आजच्या जमान्यात त्याचे थेट प्रक्षेपणही होऊ लागले. त्यामुळे हा सोहळा नेमका कसा असतो, भक्तीतील तल्लीनता कशी असते, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण वारीत सहभागी होतात अन् त्याचा भाग होतात. काहीजण काही टप्प्यांपर्यंत, तर काही वारीची पूर्ण अनूभूती घेतात.
भल्या पहाटे उठून वेळेत आवरणे अन् उजाडू लागताच पंढरीची वाट धरणे, हा वारकऱ्यांचा वारीतील नित्यक्रम आहे. मात्र, त्यात आरोग्याचाही मंत्र आहे.
‘‘डॉक्टरांनी सांगितलंय जरा चालत जा,’’ असे वाक्य अनेकांकडून आपल्याला ऐकायला मिळते. चालण्याच्या या उपक्रमाला प्रारंभ करण्यासाठी वारीसारखे दुसरे उत्तम माध्यम नाही, असे ठरवून अनेकजण वारीत काही टप्प्यांपर्यंत सहभागी होतात.
मुळात पहाटे उठण्याची व चालण्याची सवय लागते. चालून थकल्याने भूकही लागते. भोजनातील सात्त्विकताही जपली जाते. वारीत सहभागी होण्याची कारणे काहीही असली, तरी या सर्वाना एकत्र बांधणारे सूत्र एकच आहे, आणि ते म्हणजे ‘सावळे परब्रह्म!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा