पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वर्षातून चार दिवस राहुट्या उभारण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजुरी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पंढरपूरमधील चंद्रभागा प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने तिच्या वाळवंटात तिच्या वाळवंटात आणि पात्रात कुठल्याही प्रकारच्या कामास उच्च न्यायालयाने दोनदा आदेश देऊन बंदी घातली होती. असे असतानाही २७ जुलै रोजी होणाऱया आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची सबब पुढे करीत चार दिवसांसाठी चंद्रभागेच्या पात्रात आणि वाळवंटात भजन-कीर्तनासह तात्पुरत्या राहुट्या उभारण्याची परवानगी मागण्यासाठी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना चार दिवस राहुट्या उभारण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, या राहुट्या तात्पुरत्या स्वरुपातील असतील आणि त्यामध्ये कोणीही राहू शकणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.