सैराट या सिनेमात दाखवण्यात आलेली विहीर.. आर्ची आणि परशाचे भेटण्याची हक्काची जागा असलेली ही विहीर. सैराट सिनेमा प्रदर्शित झाला आणि अवघ्या महाराष्ट्राला ही विहीर आपलीशी वाटू लागली. मात्र याच विहीरीत पडून एका वारकऱ्याचा जीव गेल्याची घटना घडली आहे. करमाळ्यात असलेल्या या अष्टकोनी विहीरीमध्ये मोहन घोगळ हे ७५ वर्षांचे वारकरी बुधवारी पहाटे शौचासाठी गेले होते. मात्र तिथे त्यांना विहीरीचा अंदाज आला नाही. त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. डोक्याला मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.
सैराट हा सिनेमा महाराष्ट्रात आणि देशातही गाजला. या सिनेमातले आर्ची आणि परशा हे दोघेही सगळ्या लोकांना आपल्याच मातीतले वाटले. नागराज मंजुळे यांचा हा सिनेमा आणि त्याचा अंगावर येणारा शेवट या सगळ्यामुळे सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला. या सिनेमात या विहीरीचा मोठा सहभाग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू अर्थात परशा आणि आर्ची याच विहीरीच्या काठाशी बसून आपल्या भावी आयुष्याशी स्वप्ने रंगवाताना दाखवण्यात आली आहेत.
करमाळ्यातल्या देवीच्या माळावर असलेली ही अष्टकोनी विहीर ही सैराट सिनेमानंतर सगळ्या महाराष्ट्राच्या आकर्षणाचा विषय ठरली होती. अनेक पर्यटकांनीही या विहीरीकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून आले. आज मात्र पंढरीकडे वाटचाल करत असताना एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोहन घोगळ हे शौचासाठी गेले होते. मात्र तिथे त्यांचा पाय घसरला आणि ते विहीरीत पडले. त्यांच्या डोक्याला आणि बरगडीला मार लागला. घोगळ हे वयोवृद्ध वारकरी होते. ते एका डोळ्याने अंध होते त्यामुळे पुढे विहीर आहे याचा त्यांना अंदाज आला नसावा अशी शक्यता वर्तवली जाते आहे. मोहन घोगळ हे राहत्यातल्या रांजणगावचे रहिवासी होते. वारीदरम्यान त्यांचा या विहीरीत पडून मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्याने ते जागीच मरण पावले अशीही माहिती समोर येते आहे. सैराट सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात अालेली विहीर आता एका माणसाच्या मृत्यूचे कारण ठरली आहे.