Vitthal-Rukmini Idols: राज्यसह देशभरातील लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीचे वज्रलेप करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या रासायनिक विभागाने मूर्तीची पाहणी केली असू, त्यांच्या अहवालानुसार वज्रलेप करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. आषाढी यात्रेपूर्वी हा वज्रलेप करण्यात येईल. या पूर्वी देवाच्या मूर्तीला चार वेळा वज्रलेप करण्यात आला होता. मात्र या वज्रलेपास विविध वारकरी आणि धार्मिक संघटनांनी याला विरोध केला आहे.

विठूरायांच्या मूर्तीची पुन्हा झीज होऊ लागल्यामुळे केल्या जाणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला विरोध होत आहे. याबाबत वारकरी संघटनांच्या प्रमुख्यांनी दोन पाच वर्षांपूर्वी देण्यात आलेला लेप कसा खराब होतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत बोलताना मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणाले की, “कालच पंढरपूर देवस्थान समितीने सांगितले की, पुरातत्व विभागाने आम्हाला विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीला रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागितली आहे. चार वर्षांपूर्वीच विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीचा वज्रलेप झाला होता. त्यावेळी सांगण्यात आले होते की, कमीत कमी दहा ते बारा वर्षे याला काही होणार नाही. मग, चार वर्षांतच मूर्त्यांची झीज होते कशी?”

ते पुढे म्हणाले की, “रासायनिक लेपन प्रक्रिया ही धर्मसंमत नाही, ती धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. त्याचबरोबर चार-चार वर्षांनी पुन्हा पुन्हा मूर्तीशी जर हेळसांड केली जाणार असेल तर हे अतिशय चुकीचे आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या लेपन प्रक्रियेनंतर ज्यांनी याला १०-१२ वर्षे काही होणार नाही अशी ग्वाही देणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.”

मूर्तीची झीज कशामुळे?

दरवर्षी साधारणपणे सव्वा ते दीड कोटी भाविक विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतात. ही स्वयंभू मूर्ती वालुकाशम दगडाची आहे. अनेक वर्षांपासून मूर्तीवर झालेल्या महापुजांमुळे मूर्तीची झीज झपाट्याने होत गेली. २००९ पासून या महापूजा बंद करण्यात आल्या. मात्र, मूर्तीचे संवर्धन व्हावे झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला होता.

१९ फेब्रुवारी १९८८ साली मूर्तीवर पहिल्यांदा ॲपॉक्सीचा लेप देण्यात आला होता. यानंतर २४ मार्च २००५ आणि शेवटची प्रक्रिया १८ ते २० मार्च २०१२ मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. तर करोना काळात म्हणजे २३ जून २०२३ रोजी चौथ्यांदा वज्रलेप केला. वास्तविक पाहता दर पाच वर्षांनी लेप द्यावा, अशा सूचना पुरातत्व विभागाच्या आहेत.

Story img Loader