राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा पक्षनेते, केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतलेला राजीनामा व राजीनाम्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़तील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर शेजारच्या गोवा राज्यामध्ये सुरू असलेल्या भाजपा कार्यकारिणीमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद दिले जाणार का यावरून येथील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. तर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कृतीला पक्षाकडून कोणते उत्तर दिले जाणार यावरून व्दिधा स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील आणि देशातील घटनांच्या पाश्र्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल स्थिती निर्माण झाली असून पावसाळी वातावरणात त्यावर गरमा गरम चर्चा सुरू आहे.     
राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे पवारांनी काल राजीनामे घेतले. त्यांच्या या धक्कातंत्राचा राजकारणामुळे जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ात असणारे एकमेव राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे मंत्रिपद काढून घेतले जाणार का यावरून चर्चेला तोंड फुटले आहे. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगून लोकसभेची उमेदवारी गळ्यात घातली जाणार असाही चर्चेचा सूर आहे. तर मुश्रीफ हे मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असल्याने त्यांचे मंत्रिपद काढून घेतले जाणार नाही, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांच्या समर्थकांना मात्र त्यांच्याकडे मंत्रिपद येण्याची शक्यता जाणवत आहे. मुश्रीफ यांचे मंत्रिपद काढून घेतले तर त्याजागी आमदार पाटील यांची वर्णी लागेल, असा युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे शरद पवार हे नेमका कोणता निर्णय घेणार याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. निर्णय निश्चित होत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांची चलबिचलता ठळकपणे जाणवत आहे.    
कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये कोल्हापूर व हातकणंगले असे लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यापैकी हातकणंगले मतदारसंघामध्ये ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीची उमेदवारी सोपविण्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होती. आता या राजीनाम्याने त्याला बळ मिळाले आहे. सांगली महापालिकेची निवडणूक व हातकणंगले लोकसभेची निवडणूक याकरिता त्यांना मंत्रिपदासाठी मुक्त केले जाईल, याकडे कार्यकर्ते लक्ष वेधतात. तर दुसरीकडे जयंत पाटील यांचे समर्थक मात्र त्यांना मंत्रिमंडळात बढती मिळेल, असा विश्वास व्यक्त करतात. गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाईल आणि त्याजागी जयंत पाटील यांची वर्णी लागेल, असे समर्थन कार्यकर्त्यांतून केले जात आहे. यामुळे याही बाबतीत शरद पवार कोणती भूमिका घेतात यावरून व्दिधास्थिती झाल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या शेजारी असणाऱ्या गोवा राज्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचार समितीचे प्रमुख पद सोपविले जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनाही मोदी यांच्याकडेच हे पद सोपविले जाईल, असा विश्वास आहे. भाजपा महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनीही याची खात्री व्यक्त केली. मात्र मोदी-अडवाणी यांच्या वादात पक्षात ऐन निवडणुकीचे वातावरण सुरू असताना दुफळी होणार नाही ना यावरून भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे दिसतात.    
राष्ट्रवादी व भाजपा या दोन प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय स्थितीवरून डळमळीतपणा आला असताना काँग्रेस कार्यकर्ते मात्र या सर्व घडामोडींकडे तटस्थपणे पाहतांना दिसतात. विशेषत शरद पवार यांच्या राजकीय खेळीला काँग्रेस पक्षाकडून नेमके कशा पध्दतीने उत्तर दिले जाणार याविषयी सावध भूमिका कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
तसेच अडवाणी मोदी यांच्यातील वाद कसे वळण घेतो आणि भाजपासारख्या प्रमुख पक्षातही अस्थिरता निर्माण होते का, याकडे काँग्रेस कार्यकर्ते बारकाईने पाहत आहेत. एकंदरीत सर्वच प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनिश्चिततेचे चित्र असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा