वारंवार आंदोलने करूनही शासन स्तरावर त्याची दखल घेतली जात नसल्याने, पळस्पे ते इंदापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त कृती समितीने बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. येत्या २८ डिसेंबरपासून हे प्रकल्पग्रस्त अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूरदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी बांधकाम हटवली जात आहेत. रुंदीकरणाच्या कामाला स्थानिकांचा विरोध नसला तरी त्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाहीत. सातत्याने आंदोलने करूनही प्रकल्पग्रस्तांच्या हाती कोरडय़ा आश्वासनांपलीकडे काहीच आलेले नाही. अखेर हताश झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता बेमुदत आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तारा बांधणवाडी येथील बांधकामांना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा, भूसंपादन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मूल्यांकन करावे, महामार्ग प्रकल्पग्रस्तांना २०१३च्या भूसंपादन कायद्यातील तरतुदीचा फायदा मिळावा, संपादित झालेल्या जागेनंतर शिल्लक जागा शेतकऱ्यांना दाखवून देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही आजवर अनेक आंदोलने केली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बठकांचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे आमच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रकल्पग्रस्त समितीचे प्रमुख संतोष ठाकूर यांनी सांगितले.

Story img Loader