पंतप्रधानांनी दोनवेळा आश्वासन देऊनही वस्त्रोद्योग मंत्रालय इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणार नसेल तर येत्या सहा डिसेंबरला रिपब्लिकन पक्ष मिलची जागा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे दिला. अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात बोलत होते. पंतप्रधान मनमोहन सिंग शनिवारी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्यासमोर आरपीआय निदर्शने करेल, असेही त्यांनी जाहीर केले.
इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब अांबेडकर स्मारकाला मिळालीच पाहिजे, सर्व राजकीय पक्षांची याबाबत सकारात्मक भूमिका आहे. पंतप्रधांनांनीदेखील दिल्लीत अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत याबाबत अनुकूलता दाखवली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाला ही जागा राज्यसरकारकडे वर्ग करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र तरीही वस्त्रोद्योग मंत्रालय पंतप्रधानांचे ऐकत नसेल तर आरपीआय कार्यकर्ते गप्प बसणार नाही. एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे. मात्र दुर्दैवाने त्यांनीही या प्रश्नाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही पंतप्रधानांसमोर निदर्शने करणार आहोत, अशी माहीती आठवले यांनी दिली.
इंदू मिलच्या जागेसंदर्भात पाच डिसेंबपर्यंत निर्णय झाला नाही तर सहा डिसेंबरला आरपीआयचे कार्यकर्ते मिलचा ताबा घेतल्याशिवाय राहाणार नाही. पोलिसांनी कितीही बंदोबस्त केला तरीही आम्ही माघार घेणार नाही असा इशारा आठवले यांनी दिला.
भाजपनेही इंदू मिलच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल आठवले यांनी समाधान व्यक्त केले.
भाजपा आणि शिवसेना या पक्षांनी वेळोवेळी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. या मुद्यावर आमच्या एकत्र बैठकादेखील झाल्या आहेत त्यामुळे भाजपाने हा मुद्दा उचलला यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असेही आठवले यांनी पत्रकारांना सांगितले.
राज ठाकरे महायुतीत नकोत
राज ठाकरे यांनी महायुतीत येऊ नये, असा सल्ला आठवले यांनी यावेळी दिला. त्यांच्या महायुतीत येण्याला आरपीआयचा ठाम विरोध राहील असेही ते म्हणाले. दलित समाजात राज ठाकरे यांच्याबद्दल नाराजी आहे. राज ठाकरे यांनी अनेकदा दलित समाजाबद्दल अपशब्दही काढले आहेत त्यामुळे त्यानी महायुतीत येऊ नये आणि जर ते येणार असतील तर आरपीआयचा त्याला ठाम विरोध असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब, उद्धव आणि राज यांच्या भेटी राजकीय नाहीत. त्या खासगी आणि कौटुंबिक आहेत. त्यामुळे त्याबाबत काही तर्क करणे चुकीचे ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सहा डिसेंबरला इंदू मिल ताब्यात घेण्याचा इशारा
पंतप्रधानांनी दोनवेळा आश्वासन देऊनही वस्त्रोद्योग मंत्रालय इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणार नसेल तर येत्या सहा डिसेंबरला रिपब्लिकन पक्ष मिलची जागा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे दिला
First published on: 10-11-2012 at 05:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning indu mill prelude on 6th december