Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : रायगड येथील इर्शाळगड येथे दरड कोसळून अनेकजण बेपत्ता झाले आहेत. १९ जुलैच्या रात्री ११ च्या सुमारास ही दरड कोसळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, ही घटना समोर येताच सरकार घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे दाखल झाले असून पालकमंत्री उदय सामंत, आदिती तटकरेही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या गावात दरड कोसळण्याची पहिलीच घटना असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच, हा भाग दरड प्रवण क्षेत्रात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
“दरड जिथे कोसळली तो भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता. ही घटना समजल्यानंतर, साडेसात पर्यंत नियंत्रण कक्षात बसून होतो. एकंदरीतच पाच लोक अद्यापपर्यंत दगावली आहे. जखमींना पनवेल, एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरने छोटं मशिन पाठवायचं असेल तर ते एक टन पर्यंतच वजन उचलू शकत आहे. तसंच, हवामान खराब असल्याने टेक ऑफ करता येत नाही”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
हेही वाचा >> इर्शाळगड गावात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“राज्याचे प्रमुख घटनास्थळी दाखल झाल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. मातीची ढिगारे उचलण्यासाठी आता माणसांशिवाय पर्याय नाही. मदतकार्यासाठी तिथे ५०० – ७०० माणसे पोहोचली आहेत. अजून काही माणसं पाठवली आहेत. ठराविक काळात हे काम करावं लागणार आहे. आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत”, असंही अजित पवार म्हणाले.
माळीणच्या घटनेनंतर मागवला होता अहवाल
“माळीणची घटना जी घटना घडली. त्यानंतर आपण भारतीय भूवैज्ञानिक समिक्षण विभागाचा अहवाल मागवला. की आमच्या राज्याची परिस्थिती काय आहे. यामध्ये संभाव्य दरड प्रवण क्षेत्राची यादी करायला सांगितली आहे. त्यामुळे हा भाग दाखवलेला नाही. याआधी येथे दरड कोसळलेली नव्हती. येथे भूस्खलन होण्याच्या घटना निदर्शनास आलेल्या नाहीत. पण १७, १८, १९ जुलै या तीन दिवसांत पाऊस पडला”, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
२२८ नागरिकांची वस्ती
ज्या गावात दरड कोसळली आहे तिथे चालत जावं लागतं, चालत जायला रस्ता नाही. एनडीआरएफच्या टीमलाही तिथे जाताना त्रास झाला. मंत्रिमहोदय तिथे आहेत. मुख्यमंत्री आहेत. यंत्रणा राबवण्याच्या ठिकाणी ते आहेत. विभागीय आयुक्त, उदय सामंत, दादा भुसे, आदिती तटकरे असे सगळे लोक तिथे आहेत. मात्र, हवामान खराब आहे. हेलिकॉप्टरही जाऊ शकत नाही. जेसीबी जायला जागा नाही. काहीच समजायला मार्ग नाही. २२८ लोक तिथे राहत होती. ४८ कुटुंब होती, असं अजित पवार म्हणाले.
इतर जिल्ह्यांत अडचण नाही
ही घटना घडत असताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, नगर, गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून तिथे अडचण नाहीय. रत्नागिरी जिल्ह्यात धोक्याच्या पातळीच्या खाली नद्या आल्या आहेत. सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहोत.
आपत्कालीन क्रमांक
अजित पवारांनी आज ८१०८१९५५५४ आपत्कालीन क्रमांकही जाहीर केला आहे. आपत्कालीन काळात या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्राकडून मदत मिळणार का?
देशाच्या कोणत्याही भागात घडल्यानंतर केंद्र सहकार्य करत असतं. महाराष्ट्र सरकार आणि इथल्या सर्व यंत्रणांनी मदत करणे गरजेचं आहे, त्याला आम्ही आग्रक्रम दिलं आहे.