शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना याठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर आता रवींद्र वायकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवण्यात आले होते. तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक होते. त्यामुळे जड अंतःकरणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर तर दबाव होताच, पण माझ्या पत्नीचेही नाव गोवल्यांतर माझ्यापुढे पर्याय उरला नाही.” मुंबईमध्ये २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्याआधीच वायकर यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे विरोधकांना मात्र आयताच मुद्दा मिळाला.
रवींद्र वायकरांनी यावेळी आपल्याला भावनांना वाट मोकळी करून दिली. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून मी हाती शिवबंधन बांधले. बाळासाहेबांच्या शिवसेनेत ५० वर्ष राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली. परंतु नियतीने माझ्यासमोर प्रश्न निर्माण केले होते. नियती कसा बदल घडवून आणते”, असे रवींद्र वायकर म्हणाले.
उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न येताच रविंद्र वायकर भावूक, म्हणाले..,”ते मतदारसंघात आल्यावर…”
आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत बोलताना वायकर म्हणाले, “माझ्याविरोधात झालेली तक्रार ही फौजदारी स्वरुपाची नव्हतीच. मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले. माझे प्रकरण राजकीय होते, असे वकिलांनीही मला सांगितले. माझ्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.”
किरीट सोमय्या प्रचार करणार का?
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता त्याच किरीट सोमय्यांना तुमचा प्रचार करावा लागणार का? असा प्रश्न रवींद्र वायकर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, किरीट सोमय्यांना मी प्रचारासाठी बोलावले नाही. त्यामुळे ते माझ्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. तसेच संजय निरुपम यांनीही आरोप केले होते, मात्र आता तेच तुमचा प्रचार करत आहेत, या प्रश्नावर बोलताना वायकर म्हणाले, संजय निरुपम यांनी गैरसमजुतीमधून आरोप केले होते. त्यांना सत्य कळल्यानंतर ते माझ्यासाठी प्रचाराला लागले आहेत.
खासदार झाले तर कोणती कामे करणार?
लोकसभेत निवडून गेल्यानंतर कोणती काम करणार? याबाबतही वायकर यांनी भूमिका मांडली. जोगेश्वरीमधील गुहा वाचविणे, आरेच्या जंगलाचे संवर्धन करणे, विमानतळामुळे बाधित झालेल्या लोकांच्या समस्या सोडविणे, ना विकास क्षेत्रासंबंधी निर्णय घेणे आणि सीआरझेडच्या नियमांना शिथिल करून विकासाला चालना देणे, या पाच मुद्दयांवर अधिक भर देणार असल्याचे ते म्हणाले.